दर्जाहीन भुयारी गटार योजनेच्या कामामुळे नाराजी
ठेकेदारावर अंकुश ठेवण्याची माजी नगराध्यक्ष शेडगे यांची मागणी
रोहा, ता. ६ (बातमीदार) ः गेली अनेक वर्षे रखडलेल्या भुयारी गटार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची सुरुवात काही महिन्यांपूर्वी करण्यात आली, मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे या योजनेच्या कामासाठी लागणारे साहित्य म्हाडा कॉलनी परिसरात बांधलेल्या महिला भवनखाली मोठ्या प्रमाणात साठवून ठेवल्याने परिसराला गोडाऊनचे स्वरूप आले आहे. त्यामुळे या ठेकेदारावर प्रशासनाकडून कारवाई का केली जात नाही, असा सवाल शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी रोहा नगर पालिकेचे मुख्याधिकारी अजयकुमार एडके यांना केला आहे.
तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी बुधवारी धाटाव येथील त्यांच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधत शहरात होत असलेल्या चुकीच्या कामाचा पाढाच वाचला. या वेळी शेडगे म्हणाले की, सध्या रोहे शहरात भुयारी गटार योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम होत असताना शासनाने बांधकामसंदर्भात काही नियम आखून दिले आहेत, मात्र संबंधित ठेकेदार नियम पायदळी तुडवत असल्याचा आरोप शेडगे यांनी केला आहे. या योजनेसाठी शासन करोडो रुपये खर्च करणार आहे. असे असताना या कामावर मुख्याधिकारी व प्रशासनाचा अंकुश राहिलेला नाही. मुख्याधिकारी फेरीवाले आणि अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेऊन केवळ चमकोगिरी करण्यात मश्गुल असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे. या योजनेसाठी खासदार सुनील तटकरे यांनी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले, मात्र मुख्याधिकारी यांना काहीही देणेघेणे नसल्याचे चित्र सद्यःस्थितीत दिसून येत आहे. त्यामुळे रोहा नगरपालिकेच्या कारभारात खासदारांनी लक्ष घालावे, अशी मागणीदेखील तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी केली आहे.
....................