“तो असा खेळ खेळतोय…”, काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांची कॅप्टन रोहितनंततर गोलंदाज शमीबाबत प्रतिक्रिया, काय म्हणाल्या?
GH News March 07, 2025 03:06 AM

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हा लठ्ठ असून तो इतिहासातील सर्वात निष्प्रभ कर्णधार आहे, असं काँग्रेसच्या महिला नेत्या आणि प्रवक्त्या शमा मोहम्मद म्हणाल्या होत्या. त्यानंतर आता शमा मोहम्मद यांनी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मोहम्मद शमी याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोझा ठेवला नाही. शमी या सामन्यादरम्यान सीमारेषेवर एनर्जी ड्रिंकचं सेवन करताना दिसला. पवित्र रमजान महिन्यात शमीने रोझा न ठेवल्याने शमीचा इस्लाम संघटनेकडून निषेध केला गेला. त्यावरुन शमा मोहम्मद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शमा मोहम्मद काय म्हणाल्या?

“इस्लाम धर्मात रमजान दरम्यान एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. जेव्हा आपण प्रवास करत असतो तेव्हा रोजा (उपवास) ठेवण्याची गरज नसते. मोहम्मद शमी सध्या प्रवास करत आहे, तो घरी नाहीय. शमी असा खेळ खेळत आहे जिथे त्याला खूप तहान लागू शकते. कोणताही खेळ खेळत असलात तरी रोजा ठेवावाच लागेल, अशी कुणावरही सक्ती नाही. तुमचे कर्म सर्वात महत्त्वाचे आहेत. इस्लाम धर्म एक वैज्ञानिक धर्म आहे”, असं शमा मोहम्मद यांनी नमूद केलं आणि शमी त्याच्या जागी योग्य असल्याचं इस्लाम धर्मातील दाखला देऊन स्पष्ट केलं.

नक्की प्रकरण काय?

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आणि अंतिम फेरीत धडक दिली. या सामन्यातील पहिल्या डावात मोहम्मद शमी बाउंड्री लाईनवर फिल्डिंग करत होता. शम या दरम्यान एनर्जी ड्रिंक घेताना कॅमेऱ्यात कैद झाला. त्यामुळे शमी इस्लाम संघटनेच्या निशाण्यावर आला. “एखाद्याने जाणीवपूर्वक रोजा ठेवला नाही तर तो गुन्हेगार आहे. मोहम्मद शमीने रोजा ठेवला नाही. रोजा ठेवणं हे प्रत्येक मुस्लिमाचं आद्य कर्तव्य आहे. शमीने रोजा न ठेवून गुन्हा केला आहे. शरीयतनुसार शमी गुन्हेगार आहे”, असं ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रजवी म्हणाले. त्यानंतर शमा मोहम्मद यांनी इस्लाम धर्माचा दाखला देत शमीने योग्यच केलं, असं म्हटलं आणि भारतीय गोलंदाजाची पाठराखण केली.

शमा मोहम्मद यांची शमीबाबत प्रतिक्रिया

रोहितबाबत वादग्रस्त पोस्ट आणि मग सारवासारव

दरम्यान “रोहित शर्मा हा लठ्ठ आहे. रोहितला वजन कमी करण्याची गरज आहे. रोहित नशिबाने कर्णधार झालाय”, असं वादग्रस्त ट्विट शमा मोहम्मद यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर शमा मोहम्मद यांनी पोस्ट डिलिट केली. तसेच प्रकरण अंगाशी आल्याचं लक्षात येताच त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

“ मी अपमान करण्यासाठी एक्स पोस्ट केली नव्हती. रोहितचं खेळाडू म्हणून वजन जास्त असल्याचं म्हटलं. हे बॉडी शेमिंग नाही”, अशी प्रतिक्रिया शमा मोहम्मद यांनी एएनआयला दिली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.