Temperature Increase : फेब्रुवारी ठरला १२५ वर्षांतील सर्वाधिक उष्ण; पुण्याच्या कमाल तापमानात २.३ अंशांनी वाढ
esakal March 07, 2025 07:45 AM

- प्रज्वल रामटेके

पुणे - ओसरणाऱ्या थंडीची चाहूल देणारा फेब्रुवारी यंदा देशभर उन्हाचा चटका देणारा ठरला. एरवी उन्हाळ्यात वाढणारा कमाल तापमानाचा पारा यंदा फेब्रुवारीतच वाढला. त्याने दहा-वीस नव्हे, तर तब्बल सव्वाशे वर्षांतील उच्चांक नोंदविला.

देशात फेब्रुवारीत सरासरी तापमान २२.४ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात आले, तर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च कमाल तापमान २९.७ अंश सेल्सिअस आणि सर्वोच्च किमान तापमान १५.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

खरंतर थंडीचा महिना असणाऱ्या फेब्रुवारीत सरासरी तापमानात झालेली विक्रमी वाढ देशासाठी धोक्याचा इशारा असल्याचे हवामान अभ्यासकांनी सांगितले. यंदा फेब्रुवारीत उष्णतेचा कहर वाढला. देशाच्या अनेक भागांत अधिक तीव्रतेच्या तापमानाची नोंद झाली. पुणे आणि परिसरात फेब्रुवारीत कमाल सरासरी तापमान ३२.३ अंश सेल्सिअस असणे अपेक्षित होते.

मात्र, ते ३४.९ अंश सेल्सिअस झाले. त्यात यंदा २.६ अंश सेल्सिअसने वाढ झाल्याचे दिसून आले. दरवर्षी पुण्यात साधारणत: सरासरी किमान तापमान १२.७ अंश सेल्सिअस इतके असते, ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. त्यामुळे किमान सरासरी तापमानात यंदा २.३ अंश सेल्सिअसने वाढ झाली.

‘उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्यात किमान तापमानात घट होते. काही कारणांमुळे थंड वाऱ्यांच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊन वारे रोखले जातात. अशावेळी राज्यातील तापमानात वाढ नोंदविली जाते.

वातावरणात प्रतिचक्रवात स्थिती निर्माण झाल्याने उत्तरेकडून येणारे थंड वारे रोखले जातात. फेब्रुवारीत अशा हवामानाची स्थिती अनेकदा निर्माण झाल्याने कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली,’ असे निरीक्षण भारतीय हवामानशास्त्र विभागाचे हवामानतज्ज्ञ (वैज्ञानिक डी) डॉ. एस. डी. सानप यांनी नोंदविले.

मार्च-मेमध्ये सूर्य तळपणार

राज्यात मार्च-मेमध्ये कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ होणार असल्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात सूर्य अधिक तळपणार आहे.

पुण्यात उन्हाचा चटका वाढला

फेब्रुवारी महिना संपला असून पुणे शहर आणि परिसरात उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. मार्चच्या सुरुवातीपासूनच कमाल तापमानामध्ये सतत वाढ नोंदविण्यात येत आहे. शहरात गुरुवारी (ता. ६) ३७ अंश सेल्सिअस कमाल तापमान तर, किमान तापमान १३.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ होणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

मार्चच्या पहिल्याच आठवड्यात पुण्यात उन्हाच्या कडाक्याने तापमानाचा उच्चांक गाठला आहे. शहरात गुरुवारी (ता. ६) कोरेगाव पार्क येथे तब्बल ३९ अंश सेल्सिअस इतके, लोहगाव, चिंचवड, लवळे परिसरात ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले.

पुणे आणि परिसरात शुक्रवारी (ता. ७) कमाल तापमानामध्ये एक अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे. कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस इतके नोंदविले जाईल तर, किमान तापमान १४ अंश सेल्सिअस नोंदवले जाईल. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.