CM Devendra Fadnavis : मराठीच्या मुद्द्यावरून रणकंदन! मुंबईची भाषा मराठीच
esakal March 07, 2025 07:45 AM

मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह सुरेश (भैयाजी) जोशी यांनी केलेल्या ‘मुंबईत राहण्यासाठी मराठी येणे आवश्यक नाही,’ या विधानाचे विधानसभेत चांगलेच पडसाद उमटले. जोशी यांच्या या विधानावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.

मात्र, ‘मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे. राज्यातील प्रत्येकाने मराठी शिकली पाहिजे. आम्ही इतर भाषांचा सन्मान करतो, पण ज्याला आपल्या भाषेवर प्रेम असते तोच इतर भाषांचाही सन्मान करतो,’ असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची भाषा ही मराठीच असल्याचे ठणकावून सांगितले.

भैयाजी जोशी यांच्या मराठीवरील वक्तव्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे आणि भाजपचे आमदार नीतेश राणे यांच्यात यावरून जोरदार खडाजंगी झाली. भाजप आणि ठाकरे गटाचे सदस्य एकमेकांसमोर आले.

दोन्ही बाजूच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब केले. ठाकरेंच्या पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे.

मात्र, भैयाजी जोशी यांनी घाटकोपरमध्ये गुजराती समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तिथे गुजराती भाषा बोलली गेली तरी हरकत नाही, असे विधान केले. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करावी,’ अशी मागणी त्यांनी केली. जाधव यांच्या मागणीवर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, ‘भैयाजी जोशी काय म्हणाले ते मी ऐकलेले नाही.

मात्र, सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठीच राहील. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकली पाहिजे आणि प्रत्येकाला मराठी बोलता आली पाहिजे. मात्र, आम्ही इतर भाषांचाही सन्मान करतो. त्यामुळे अन्य भाषिकांनीही मराठी भाषेचा सन्मान केला पाहिजे,’ असे स्पष्ट केले.

आदित्य ठाकरेंना रोखले

मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर आदित्य ठाकरे बोलण्यासाठी उभे राहिले, मात्र भाजप सदस्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. ‘मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे, आता पुढील कामकाज सुरू होऊ द्या,’ असा आग्रह नीतेश राणे यांनी धरला. त्यावर आदित्य ठाकरे यांनी, ते फक्त आभार मानायला उभे राहिल्याचे सांगितले.

मात्र, यावरून ठाकरे आणि राणे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. ठाकरे यांच्या मदतीला वरुण सरदेसाई आणि इतर आमदार धावून आले, तर भाजपकडून नीतेश राणे, योगेश सागर आणि आशिष शेलार आक्रमक झाले. दोन्ही बाजूंकडून जोरदार गोंधळ सुरू झाला.

त्यातच वरुण सरदेसाई यांनी योगेश सागर यांच्याकडे पाहत, ‘तुमची लायकी नाही’ असे उद्गार काढले. त्यावर संतप्त झालेल्या सागर यांनी, ‘चारकोपमध्ये ये मग माझी लायकी दाखवतो’, असे आव्हान दिले. त्यावरून गोंधळ सुरु झाल्याने विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाच मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. मात्र त्यानंतरही काही काळ हा गोंधळ सुरूच होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.