देशाची भाषावार प्रांतरचना झालीय, आता हे मुंबईची गल्लीरचना करताहेत का? असा सवाल करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रा. स्व. संघाचे नेते भैयाजी जोशी यांच्या विधानावर टीका केली. जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच, ठाकरे यांनी जोशी यांचा उल्लेख ‘अनाजी पंत’ असा करत ‘कोरटकरप्रमाणे जोशी चिल्लर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे’ असे आव्हान दिले.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘तोडा-फोडा-राज्य करा अशा प्रकारची विकृत वृत्ती बळावत आहे. मराठी सक्तीचा कायदा मी मुख्यमंत्री असताना केलेला आहे. कारवाई केली तर यांची पुन्हा हिंमत होणार नाही. त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा हा संघाचा छुपा अजेंडा असल्याचे स्पष्ट होईल. भाजप आणि संघाची ही वृत्तीच आहे. पिल्लू सोडायचे आणि पिल्लू मोठे झाले की खांद्यावरती घ्यायचे. तुम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे काही उपकार केले नाहीत.’
उत्तर विरुद्ध दक्षिण असा देश तोडायचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला. ‘भाजपला ‘इंडिया’ नाही तर ‘हिंदिया’ करायचा आहे. भाजपमध्ये असलेल्या सगळ्या लोकांना जर आपल्या भाषेबद्दल काही वाटत नसेल तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. यांचे संपूर्ण लक्ष मुंबईतील बँकांवर आहे. मराठी माणसांना यांच्या लेखी किंमत नाही. त्यामुळेच हे लोक मुंबई-अहमदाबाद अशी बुलेट ट्रेन तयार करत आहेत,’ असाही दावा ठाकरेंनी केला.
भैयाजी जोशी हे वंदनीय आणि आदरणीय आहेत. त्यांचे वक्तव्य तोडूनमोडून दाखवण्यात आले. जोशी यांच्या या वक्तव्यामागील भाव समजून न घेता काही लोक टोकाचा अर्थ काढत आहेत.
- राम कदर, आमदार, भाजप
हुतात्मा चौकात निदर्शने
भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचे विधिमंडळात आणि बाहेरही पडसाद उमटले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हुतात्मा चौकात जमत या वक्तव्याचा जोरदार निषेध केला. तसेच ‘मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, अशा घोषणा देत मराठीला विरोध करणाऱ्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.
भैयाजी जोशी यांचे वक्तव्य प्रत्येक मराठी माणसाने ऐकावे. त्यांनी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा अपमान केला आहे. राज्य सरकारने मरीन ड्राईव्हवरील मराठी भवन आणि गिरगावमधील दालन देखील रद्द केले आहे.
- आदित्य ठाकरे, आमदार, शिवसेना (ठाकरे पक्ष)
‘मराठी भाषा शिकलीच पाहिजे’
मुंबईत मराठी भाषा शिकणे गरजेचे नाही, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी बुधवारी (ता. ६) केल्यानंतर त्यांच्यावर सर्वत्र टीका झाली. अखेर त्यांनी घूमजाव करीत मुंबई-महाराष्ट्रात प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे, असे स्पष्टीकरण दिले.
विद्याविहार येथे काल एका कार्यक्रमात जोशी यांनी ‘मुंबईत वेगवेगळ्या भाषा असल्यामुळे मुंबईत येणाऱ्याने मराठी शिकणे जरुरी नाही,’ अशा आशयाचे विधान केले होते. त्यावर आज सर्वपक्षीयांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठविल्यामुळे मुंबईतील विश्व संवाद केंद्रातर्फे भैयाजी जोशी यांचे स्पष्टीकरण प्रसिद्ध करण्यात आले आहे.
‘माझ्या कालच्या बोलण्यामुळे काही गैरसमज होत आहेत. मी विविध भाषांच्या सहअस्तित्वावर बोलत होतो. त्यामुळे मी स्वतः स्पष्ट करू इच्छितो की, मुंबई व महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे आणि प्रत्येकाने मराठी भाषा शिकली पाहिजे,’ असे जोशी यांनी म्हटले आहे.