लंडन - ‘पाकिस्तानने चोरलेला भाग आम्हाला परत केल्यास काश्मीर समस्या मार्गी लागेल,’ असे केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज पाकिस्तानला व्याप्त काश्मीरवरून सुनावले. येथील थिंक टँक चाथम हाउसमध्ये आयोजित ‘इंडियाज राइज अँड रोल इन दि वर्ल्ड’ या विषयावर आयोजित चर्चासत्रामध्ये ते बोलत होते.
अमेरिकेतील ट्रम्प सरकार आणि त्यांच्या प्रशासनाकडून लादण्यात येणाऱ्या आयातशुल्कावर देखील त्यांनी भाष्य केले. या चर्चासत्रामध्ये बोलताना काहीजणांनी काश्मीर समस्येबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी सगळा घटनाक्रम कथन केला.
मंत्री जयशंकर म्हणाले की जम्मू-काश्मीरला वेगळा दर्जा देणारे ३७० वे कलम रद्द करणे हे पहिले पाऊल होते, प्रगतीला चालना देत, आर्थिक घडामोडींमध्ये वाढ करणे आणि सामाजिक न्यायाचा आग्रह हे दुसरे पाऊल होते. विक्रमी टक्केवारीने घेण्यात आलेले मतदान हे तिसरे पाऊल होते. आता पाकव्याप्त काश्मीर आमच्याकडे येणे गरजेचे आहे. आम्ही त्याचीच वाट पाहात आहोत.
पाकिस्तानने बेकायदा पद्धतीने त्याची चोरी केली आहे. ज्या दिवशी पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात येईल तेव्हा काश्मीर समस्येचे देखील निराकरण झालेले असेल. अमेरिकेतील ट्रम्प यांचे प्रशासन आता बहुध्रुवीय राजकारणाच्या दिशेने पाऊल टाकू लागले असून ही बाब भारताच्याच हिताची आहे. दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापारी कराराचा आग्रह धरला असल्याकडेही जयशंकर यांनी लक्ष वेधले.
ट्रम्प धोरणाचे समर्थन
ट्रम्प यांच्या नजरेतून आपण पाहिले तर एक बाब स्पष्टपणे दिसून येते ती म्हणजे आपल्याकडे ‘क्वाड’सारखी मोठी संघटना आहे. ‘क्वाड’चे सदस्य असलेले देश परस्परांना चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतात तसेच ते त्यांचा वाटाही द्यायला तयार आहेत. या संघटनेमध्ये कोणीही फुकटखाऊ नाही.
क्वाड ही एक आदर्श संघटना असून हे मॉडेल बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचे दिसून येते असेही जयशंकर यांनी स्पष्ट केले. आयातशुल्काबाबत अमेरिकेसोबत चर्चा करण्यासाठी वाणिज्य आणि व्यापारमंत्री पीयूष गोयल हे सध्या वॉशिंग्टनला गेले असून तिथे ते द्विपक्षीय कराराबाबत चर्चा करतील. मागील महिन्यामध्ये खुद्द पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांच्याशी संवाद साधताना या मुद्याचा उल्लेख केला होता.
पाकव्याप्त काश्मीर घ्यायला आम्ही कधी विरोध केला आहे? तो भाग घेऊ नका असे आम्ही कधी म्हटले आहे? तुमच्यात क्षमता असेल तर त्या भागावर आताच दावा करा. पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर घेताना जो भाग चीनच्या ताब्यात आहे तो देखील परत घेतला जावा.
- उमर अब्दुल्ला, जम्मू- काश्मीरचे मुख्यमंत्री
खलिस्तान्यांचा गाडीला घेराओ
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या गाडीला खलिस्तान समर्थक गटाने घेराओ घालून जोरदार घोषणाबाजी केली. या टवाळखोरांच्या कृत्याचा भारत सरकारनेही कठोर शब्दांत निषेध केला आहे. काही समाजकंटकांनी यावेळी जयशंकर यांच्या मोटारीचा पाठलाग करत राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याची बाब उघड झाली आहे. स्थानिक मेट्रोपॉलिटन पोलिस अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखून त्यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला.