मुंबई - ‘सकाळ माध्यम समूह’ने आयोजित केलेल्या श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक नोंदणी करीत असून, त्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून वेगवेगळ्या सोयी-सुविधांनी ‘भक्तीचा महाकुंभ’ सज्ज होत आहे. उद्यापासून (ता. ८) या उत्सवाला सुरुवात होणार असून, २१ श्रीगुरूंच्या पादुकांसाठी वरळीच्या एनएससीआय डोममध्ये आकर्षक मंदिरे साकारली जात आहेत.
संतपरंपरा जपणाऱ्या महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे मुख्य प्रवेशद्वार, नोंदणी करून आलेल्या भाविकांना ‘क्यूआर’ कोड स्कॅन करणारे कक्ष साकारण्यात येत आहेत. येणाऱ्या भाविकांची पादत्राणे ठेवण्यासाठी मंडपाबाहेर विशेष कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. तिथे पादत्राणे काढून मंडपात प्रवेश करता येईल.
साधकांसाठी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात येत असून, ज्येष्ठ नागरिक, अपंग किंवा ज्यांना चालता येत नाही अशांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था असणार आहे. भाविकांसाठी विविध स्टॉल आणि स्वच्छतागृहांची व्यवस्थाही आहे. दर्शनार्थींना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून मंडपामध्ये ठिकठिकाणी गुरुसेवक सज्ज असणार आहेत.
या महोत्सवात शनिवारी (ता. ८) सकाळी १० वाजता ‘भक्ती शक्ती व्यासपीठ’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जीवनविद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या उत्सवानिमित्त रविवारी (ता. ९) सकाळी ९ वाजता आध्यात्मिक गुरू, लेखक, शिक्षणतज्ज्ञ तथा सत्संग फाउंडेशनचे प्रमुख पद्मभूषण श्री एम यांचे व्याख्यान होणार आहे.
उत्सवात पोहोचण्यासाठी महालक्ष्मी (पश्चिम रेल्वे), भायखळा (मध्य रेल्वे) ही नजीकची उपनरीय रेल्वे स्थानके असून, कार्यक्रम स्थळाशेजारी नेहरू तारांगण हे बेस्टचे बस स्थानक आहे. सहभागी होण्यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात आलेले नाही. प्रत्येकाला निर्विघ्नपणे श्रीपादुकांचे दर्शन व्हावे म्हणून ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. त्यासाठी भाविकांना सोबतचे क्यूआर कोड स्कॅन करून आपला प्रवेश निश्चित करता येणार आहे.
महोत्सवात संत आणि गुरूंच्या पादुका
ज्ञानेश्वर महाराज
संत मुक्त्ताई
नामदेव महाराज
संत जनाबाई
नरहरी सोनार
सेना महाराज
सावता माळी
एकनाथ महाराज
तुकाराम महाराज
संत निळोबाराय
श्री महेश्वरनाथ बाबाजी
श्री स्वामी समर्थ
श्री साईबाबा
श्री गजानन महाराज
समर्थ रामदास स्वामी
टेंब्ये स्वामी महाराज
गोंदवलेकर महाराज
शंकर महाराज
गुळवणी महाराज
सद्गुरू गजानन महाराज
श्रीगुरू बालाजी तांबे