चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत आणि न्यूझीलंडच्या संघांमधली फायनल दुबईत सुरू आहे.
न्यूझीलंडनं 50 षटकात 251 धावा केल्या. त्यामुळे भारतासमोर जिंकण्यासाठी 252 धावांचं आव्हान आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडचा निम्मा संघ माघारी परतला होता. त्यात वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजानं विकेट्स काढल्या आणि किवी टीमच्या धावांच्या रथाला ब्रेक लावला.
पण डॅरिल मिचेल आणि मायकल ब्रेसवेलच्या अर्धशतकी खेळींमुळे न्यूझीलंडला अडीचशे धावांचा पल्ला गाठता आला.
खरंतर रचिननं काही चांगले फटके खेळले. त्याचे दोन झेल भारतीय संघाकडून सुटल्यानं रविंद्रला दोनदा जीवदान मिळाले.
पण वरुणनं चांगली गोलंदाजी करत विल यंगला बाद करत सलामीची जोडी फोडली. यंग 15 धावांवर असताना पायचित झाला.
मग 11 व्या ओव्हरमध्ये रोहितनं कुलदीपच्या हाती चेंडू दिला, तेव्हा कुलपदीपनं पहिल्याच चेंडूवर गुगली टाकत रचिनला बुचकाळ्यात टाकलं. रचिन बोल्ड झाला आणि न्यूझीलंडचे दोन्ही सेट सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतले.
त्यानंतर कुलदीपनं त्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्येही फिरकीचा जादू दाखवली. कुलदीपनं स्वतःच्याच चेंडूवर विल्यमसनचा झेल घेत, न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. रचिननं 37 तर विल्यमसननं 11 धावा केल्या.
रविंद्र जाडेजानं टॉम लेथमला पायचीत करून न्यूझीलंडला चौथा धक्का दिला. लेथम 14 धावाच करू शकला.
त्यानंतर डॅरिल मिचेलनं ग्लेन फिलिप्ससह किवी टीमचा डाव सावरायचा प्रयत्न केला. पण वरुणनं ग्लेन फिलिप्सचा त्रिफळा उडवला आणि ही भागीदारी फोडली. फिलिप्स 34 धावांवर बाद झाला.
डॅरिल मिचेलनं झुंजार खेळी करत अर्धशतक ठोकलं. पण तो 63 धावांवर असताना मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर रोहित शर्माकडे झेल देऊन माघारी परतला.
मिचेल सँटनर आठ धावांवर धावचीत झाला. मायकल ब्रेसवेलनं नाबाद 53 धावांची खेळी केली.
भारताचा कर्णधार रोहित शर्मानं यानिमित्तानं सलग बाराव्यांदा टॉस हरला .
दुबईच्या मैदानात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरनं नाणेफेक जिंकील आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
न्यूझीलंडच्या संघातून मॅट हेन्री दुखातीमुळं बाहेर पडला आणि त्याऐवजी नाथन स्मिथचा किवी टीममध्ये समावेश झाला आहे.
तर भारत सेमिफायनलमध्ये खेळलेल्या संघासहच मैदानात उतरला.
भारतीय टीम: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रविन्द्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती
न्यूझीलंड टीम: विल यंग, रचिन रविंद्र, केन विलियमसन, डॅरिल मिचेल, टॉम लेथम, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, विल्यम ओरूर्क, नेथन स्मिथ
या स्पर्धेत विजेतेपदासाठी भारतीय संघ फेव्हरेट असल्याचं म्हटलं जात आहे. कागदावर आणि मैदानावरही भारतीय संघ प्रबळ ठरल्याचं पाहायला मिळालं आहे.
त्याचवेळी प्रतिस्पर्धी न्यूझीलंडच्या संघानं आतापर्यंत आयसीसी स्पर्धांत भारताला कडवं आव्हान दिल्याचं तथ्य नाकारता येणार नाही.
आतापर्यंत झालेल्या चारही सामन्यात भारतीय संघाच्या एकत्रित कामगिरीनं पराभवाला पूर्णपणे दूर ठेवलं आहे.
रोहित शर्माचं कर्णधारपद, कोहलीचा परतलेला फॉर्म, गोलंदाजी फलंदाजांचे भरपूर पर्याय आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचं कसब अशा सर्वच पातळ्यांवर भारतीय संघानं अव्वल कामगिरी केली आहे.
भारतीय फलंदाजांचा फॉर्मभारतीय फलंदाजीचा विचार करता स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना सलामीला फारच कमाल दाखवता आली नसली, तरी भारतीय फलंदाजी अगदीच ढेपाळलीही नाही.
तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या कोहलीला सूर गवसल्यानं ती सर्वात सकारात्मक बाब समोर आली आहे. शिवाय श्रेयस अय्यर आणि केएल राहुल त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. तसंच अक्षर पटेलला वरच्या क्रमांकावर खेळवण्याचा निर्णयही भारतीय संघासाठी आतापर्यंत कामी आल्याचं पाहायला मिळालं आहे.
आयसीसी वन डे रँकिंगमध्ये सध्या पहिल्या 8 मध्ये भारताच्या शुबमन, विराट, रोहित आणि श्रेयस या चौघांचा दबदबा आहे.
पण असं असलं तरी न्यूझीलंड विरोधात झालेल्या साखळी सामन्यात भारतीय फलंदाजांना किवी गोलंदाजांनी हैराण केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्याबाबत विचार करूनच भारतीय संघ आज नक्कीच मैदानात उतरेल.
चिवट किवी संघभारतीय संघ मजबूत दिसत असला तरी प्रतिस्पर्धी असलेल्या किवी संघाच्या विरोधात भारताला अत्यंत सावधपणे खेळावं लागणार आहे. किवी संघाचीही फलंदाजी आणि गोलंदाजी अत्यंत उत्तम आहे. पण त्यांचं क्षेत्ररक्षण हा आणखी जमेची बाजू आहे.
यापूर्वी साखळी सामन्यात विराटचा ज्याप्रकारे झेल ग्लेन फिलिपनं घेतला होता, त्यानं सर्वांनाच धक्का बसला होता. त्यामुळं कोणत्याही क्षणी हा संघ प्रतिस्पर्धी संघाला पछाडून उत्तम कामगिरी करू शकतो.
शिवाय मोठ्या सामन्यांत न्यूझीलंडची भारताविरोधातील कामगिरी चांगली राहिली आहे. 2000 मध्ये न्यूझीलंडने फायनलमध्ये भारताला पराभूत करुनच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.
त्याशिवाय 2019 वर्ल्डकपमध्ये किवी संघानं सेमिफायनलमध्ये भारताचा पराभव केला होता. तर 2021 च्या वर्ल्ड टेस्ट चॅपियनशिप फायनलमध्येही न्यूझीलंडनं भारताला पराभूत करुनच विजय मिळवला होता.
रोहित शर्माच्या नेतृत्वात टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवत भारतानं आयसीसी स्पर्धांतील पराभवाची मालिका खंडित केली आहे. आता या स्पर्धांत विजयाची नवी मालिका सुरू करण्याची संधी भारतीय संघासमोर आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.