नवी मुंबईत धवल गीत स्पर्धेला प्रतिसाद
शहरातील ४० महिला धवलारीनींचा सहभाग
तुर्भे, ता. ९ (बातमीदार) : जागतिक महिलादिनानिमित्त तुर्भे गावात ‘पारंपरिक धवल गीत’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शहरातील ४० महिला धवलारीनींनी सहभाग घेतला होता. या वेळी विजेत्यांना विविध बक्षिसे देण्यात आली.
आगरी कोळी समाजातील लग्न सोहळ्यातील विधी या धवल गीतानेच पूर्ण होतात. त्यामुले धवल गीतांची परंपरा लुप्त होऊ नये, या उद्देशाने राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महिलादिनाचे औचित्य साधत पहिल्यादा नवी मुंबईतील धवलारीनींसाठी पारंपरिक धवल गीताची स्पर्धा आयोजित केली होती. या वेळी शहरातील ४० महिला धवलारीनींनी सहभाग घेतला होता. या वेळी वयाच्या ८५ वर्षांच्यादेखील धवल गीत गाणाऱ्या धवलारीनींनी स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. पारंपरिक धवल गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक स्पर्धकांनी लग्नातील प्रत्येक विधीतील धवल गीत गाऊन त्याचा अर्थही सांगितला. आगरी-कोळी समाजात धवलारीनींशिवाय लग्नकार्य अशक्य आहे, मात्र सध्या ज्येष्ठ धवलारीनींची संख्या कमी होत चालली आहे. नवीन धवलारीन तयार होताना दिसत नाहीत. त्यामुळे आगरी-कोळी समाजाची संस्कृती जोपासण्यासाठी आणि भावी पिढीकडून आगरी-कोळी संस्कृतीचे संवर्धन होण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत धवलारीनींचा सन्मान करण्यात आला. प्रथम क्रमांक सुमन पाटील गोठवली गाव, द्वितीय क्रमांक हौसाबाई सुतार वाशीगाव, तृतीय क्रमांक यशोदाबाई पाटील दिवागाव यांना विजेत्या म्हणून घोषित करण्यात आले. या स्पर्धेत विशेष लकी ड्रॉ भाग्यवान विजेत्याचा मान शकुंतला पाटील यांना मिळाला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून धवलारीन बाय अवनी पाटील, गायिका चंद्रकला दासरी व नवनाथ ठाकूर उपस्थित होते.
...................