शहापूर (बातमीदार) : जागतिक महिलादिनी वृषाली महिला सामाजिक संस्था व वृषाली मंचच्या वतीने तावडेनगर येथे महिला आनंद मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात विधवा अनिष्ठ प्रथा निर्मूलनाच्या दृष्टीने विधवा महिलांच्या स्वाभिमानासाठी व अशुभ परंपरा दूर करण्यासाठी विधवा महिलांचे पूजन तसेच हळदीकुंकू करण्यात आले. या वेळी अवयवदान करणाऱ्या योगिता भोंडिवले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. परफेक्ट लॅब व वृषाली संस्थेच्या वतीने रक्ततपासणी शिबिरही घेण्यात आले. या वेळी कुणबी समाज संघाचे अध्यक्ष किशोर कुडव, वृषाली संस्थेच्या अध्यक्ष वृषाली पाटील, सचिव संगीता सोनारे, शुभांगी निचिते, पूनम धीर्डे, भारती सोनारे, संस्थेचे समन्वयक सुरेश पाटील, अशोक सोनारे, रहिवासी मंडळाचे दत्ता विशे, संध्या सासे, जयश्री वेखंडे यांच्यासह शेकडो महिलांनी सहभाग घेतला.