वाडा, ता. ९ (बातमीदार) : जागतिक महिलादिनानिमित्त वाडा तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
चिंचघर ग्रामपंचायत, सी.ए.सी.आर. ही स्वयंसेवी संस्था आणि ई.पी.एल. ही वित्तीय सहाय्य करणारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृहात शिबिर आयोजित करण्यात आले होते. मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी शिबिराला उपस्थित महिलांच्या वजन व उंची, बी.एम.आय., मधुमेह तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, रक्तदाब तपासणी, दंतचिकित्सा, नेत्रतपासणी व चष्मावाटप करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच प्रेमा नांगरे, उपसरपंच मनेश पाटील, सदस्य संगीता भोईर, सी.एस.सी.आर. संस्थेच्या मंजुषा सोनवणे, स्वच्छ भारत मिशनचे जिल्हा तज्ज्ञ मार्गदर्शक संजय ठाकरे, तालुका समन्वयक किरण मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. या आरोग्य शिबिरात सुमारे १५० महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.