पुणे : स्त्रियांवर होणारे अत्याचाराच्या विरोधात आणि मेट्रोमध्ये तरुणांना रोजगार मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुणे महापालिका कार्यालयासमोर असणाऱ्या मेट्रो स्थानकावर आंदोलन केले. आंदोलक गुपचूप मेट्रो स्थानकात पोचले. यानंतर ते थेट मेट्रो रुळावर उतरले. त्यांनी जवळपास एक तास निदर्शने देत मेट्रो वाहतूक रोखून धरली. त्यामुळे प्रवाशांची मोठा खोळंबा झाला. आंदोलनात कार्यकर्त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नरेंद्र पावटेकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. आंदोलकांनी मेट्रो रुळावर उतरून आंदोलन केल्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा मेट्रो स्थानकात दाखल झाला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलक समजून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. विशेष म्हणजे तुम्ही आम्हाला रुळावरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर आम्ही खाली उड्या मारू, असा इशारा आंदोलकांनी दिला. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांच्या सुरक्षेसाठी मेट्रो रुळाच्या खाली संरक्षण जाळ्या धरून पोलिस जवानांना उभे केले होते.
एक तास उलटल्यानंतरही आंदोलकांनी ऐकून न घेतल्याने पोलिस मेट्रो रुळावर उतरले व आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलकांनी पोलिसांसोबत बाचाबाची केली. यावेळी पोलिस आणि आंदोलक यांच्यात धक्काबुक्की देखील झाली. आंदोलकांकडून महिला पोलिस कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप केला जातोय. यामुळे पोलिसांचा संयम सुटला. पोलिसांनी मग आंदोलकांची धरपकड करण्यास सुरुवात केली. आंदोलकांनी परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनाही धक्काबुक्की केल्याने प्रकरण जास्त चिघळले. पोलिसांनी आंदोलकांना मारझोड करत पोलिस व्हॅनमध्ये नेले. त्यानंतर आंदोलकांना शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते.
या घटनेनंतर नरेंद्र पावटेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांचे आजचे आंदोलन हे वैयक्तिक आहे. त्याचा पक्षाशी काही संबंध नाही. पुणेकरांची अडवणूक करणे आणि पोलिस अधिकाऱ्यांबरोबर हुज्जत घालणे या सर्व प्रकाराबाबत पक्षाचा काहीही संबंध नाही. त्यांनी केलेला प्रकार निषेधार्थ आहे.
प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष