चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा न्यूझीलंडचा अष्टपैलू ग्लेन फिलिप्सने त्याच्या क्षेत्ररक्षणाने गाजवली आहे. त्याने संपूर्ण स्पर्धेत अनेक अफलातून झेल घेतले आहेत. त्याच्या याच शानदार क्षेत्ररक्षणाचा प्रत्येय भारताविरुद्ध सुरू असलेल्या अंतिम सामन्यातही आला आहे.
रविवारी (९ मार्च) दुबईमध्ये न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात अंतिम सामना होत आहे. या सामन्यात भारताने सुरुवात चांगली केली होती. पण नंतर न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनी त्यांच्या संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले.
या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर २५२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतकडून कर्णधार रोहित शर्माने चौकार - षटकारांची बरसात करत सुरुवात चांगली केली होती. त्याला दुसऱ्या बाजूने शुभमन गिल साथही देत होता. रोहितने अर्धशतकही केले.
तसेच शुभमन गिलसोबत शतकी भागीदारीही केली. त्यामुळे न्यूझीलंडसमोरील आव्हान कठीण झाले होते. परंतु, याचवेळी १९ व्या षटकात ग्लेन फिलिप्सने अफलातून झेल घेत न्यूझीलंडला पहिले यश मिळवून दिले.
कर्णधार मिचेल सँटेनरच्या गोलंदाजीवर शुभमन गिलने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु कव्हरच्या दिशेने येत असलेला हा चेंडू ग्लेन फिलिप्सने हवेत मागे उडी घेत एका हाताने झेलला. त्याचा हा झेल पाहून अनेक जण आश्चर्यचकीत झाले होते. पण त्याच्या झेलामुळे गिलला ५० चेंडूत ३१ धावांवर माघारी परतावे लागले. तो बाद झाल्यानंतर पहिल्या विकेटसाठीची १०५ धावांची भागीदारीही तुटली.
गिल बाद झाल्यानंतर मात्र भारताने दुसरी विकेटही पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर गमावली. मायकल ब्रेसवेलने विराट कोहलीला १ धावेवरच पायचीत केले. त्यामुळे न्यूझीलंडला सामन्यात पुनरागमनाची संधी मिळाली.
विराट बाद झाल्यानंतर भारताची धावगती मंदावली. त्यातच रोहित शर्माला रचिन रवींद्रने चकवले. त्याने २७ व्या षटकात रोहितला बाद केले. रोहित ८३ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसब ७६ धावा करून यष्टीचीत झाला.
तत्पुर्वी या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलने १०१ चेंडूत ६३ धावांची खेळी केली, तर मायकल ब्रेसवेलने ४० चेंडूत नाबाद ५३ धावा केल्या. तसेच रचिन रवींद्रने २९ चेंडूत ३७ धावा केल्या. ग्लेन फिलिप्सने ३४ धावांचे योगदान दिले. त्यामुळे न्यूझीलंडने ५० षटकात ७ बाद २५१ धावा केल्या होत्या.
भारताकडून कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती या फिरकीपटूंनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांनाही प्रत्येकी १ विकेट मिळाली.