Final IND vs NZ Live :भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकून इतिहास घडवला. ही स्पर्धा तीन वेळा जिंकणारा तो जगातील एकमेव संघ ठरला. भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर ४ विकेट्स राखून विजय मिळवला. न्यूझीलंडच्या ७ बाद २५१ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ६ बाद २५४ धावा केल्या. रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल यांनी फलंदाजीत दमदार खेळ केला.
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ७ बाद २५१ धावा केल्या. डॅरील मिचेल ( ६३) व मिचेल ब्रेसवेलने ( ५३) धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात, रोहित व शुभमन गिल ( ३१) यांनी १०५ धावांची सलामी दिली. रोहितने ८३ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७६ धावा केल्या. श्रेयस ६२ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ४८ धावांवर बाद झाला. अक्षरनेही २९ धावा केल्या. या दोघांनी ७५ चेंडूंत ६१ धावांची भागीदारी केली. त्यानंतर लोकेश राहुल व हार्दिक पांड्याच्या ३८ धावांच्या भागीदारीने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. हार्दिक १८ धावांवर बाद झाला, परंतु लोकेशने नाबाद ३४ धावांची खेळी करून विजय साकारला. रवींद्र जडेजाने विजयी चौकार खेचला.
चेंडू चौकार जाताच जडेजा आनंद साजरा करू लागला होता. त्याने गोलंदाज ओ'रोर्कलाही पाहिले नाही आणि त्याला तो अनवधानाने आदळला. कोहली जल्लोष करताना दिसला आणि त्यानंतर त्याने अभिषेक नायर त्याला मिठी मारली. मुंख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनेही कोहलीला मिठी मारली. जडेजा भारतीय ड्रेसिंग रूमच्या दिशेने चुंबन घेताना दिसला. वरुण चक्रवर्थी, हर्षित राणा आणि अर्शदीप हे मैदानावर धावत आले आणि जडेजा व लोकेश राहुलला मिठी मारली.
त्यानंतर रोहित चेहऱ्यावर मोठे हास्य घेऊन मध्यभागी गेला आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन केले. जडेजाने गंभीरला उचलले, तर रोहित श्रेयसला मिठी मारली. रोहित आणि कोहली यांनी स्टंप हातात घेतला आणि दांडिया खेळला. जड्डू, राणा व अर्शदीप यांनी २०१३ च्या जेतेपदाच्या सेलिब्रेशनची पुनरावृत्ती केली.
हार्दिक पंड्या म्हणाला, आयसीसी स्पर्धा जिंकणे नेहमीच अद्भुत असते, विशेषतः चॅम्पियन्स ट्रॉफी. २०१७ हे वर्ष माझ्या मनाच्या अगदी जवळचे होते. त्यावेळी आम्ही जेतेपद पटकावू शकलो नाही. यावेळी सर्वांनी कसे योगदान दिले याबद्दल आनंद झाला.