रविवारचा दिवस (९ मार्च) भारतीय क्रिकेट संघासाठी आणि चाहत्यांसाठी अविस्मरणीय दिवस ठरला. भारताने १२ वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले आहे. भारतीय संघाने रविवारी रोहित शर्माच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा जिंकली.
दुबईला झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला ४ विकेट्सने पराभूत केल. भारताचे हे एकूण सातवे विजेतेपद आहे. तसेच एकूण तिसरे चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद आहे.
यापूर्वी भारताने १२ वर्षांपूर्वी २०१३ साली एमएस धोनीच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी भारतीय संघात असलेले रोहित शर्मा, आणि रवींद्र जडेजा २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय संघाचेही सदस्य आहेत.
दरम्यान, २०१३ मध्ये जेव्हा भारताने अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत करत विजेतेपद जिंकले होते, तेव्हा विराट कोहलीने ट्रॉफी मिळाल्यानंतर फोटोशुटवेळी गँगनम स्टाईल गाण्यावरील डान्स स्टेप्स करत सेलीब्रेशन केले होते. तसेच त्याने पुशअप्सही मारले होते.
यावेळी जेव्हा जिंकला, तेव्हा सामना जिंकल्या जिंकल्या रवींद्र जडेजा, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंगने त्या आठवणींना उजाळा देत गँगनम स्टाईलच्या डान्स स्टेप्स केल्या. तसेच ट्रॉफी मिळाल्यानंतर फोटो शुटवेळी विराटसारखं यावेळी श्रेयस अय्यरने भन्नाट डान्स केला. या घटनेचे व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहेत.
भारतीय संघाच्या खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्यही रविवारी स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी विजेतेपदानंतर आपल्या जवळच्या वक्तींसोबतही आनंद साजरा केला. भारतीय खेळाडूंचे कुटुंबासोबतचे क्षणही अनेक कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले असून त्याचे व्हिडिओही व्हायरल होत आहेत.
भारत पहिला संघभारताने २००२ साली श्रीलंकेसह संयुक्तरित्या पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर २०१३ साली भारताने दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. यानंतर आता रविवारी भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले.
त्यामुळे तीन वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा भारत पहिला संघ ठरला आहे. भारताने याबाबतीत ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाने दोनवेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.