बिडकीन : पैठण तालुक्यातील बिडकीन पोलिस ठाणे हद्दीतील शेकटा येथील एका शेततळ्यात दोन बालकांचा बुडुन मृत्यू झाला असुन हि घटना आज ता.०९ रोजी दुपारच्या वेळी उघडकीस आली आहे.प्रणव दिपक दाभाडे,वय.०७ वर्षे व आरूष दत्ता दाभाडे,वय.०५ वर्षे, दोघेही रा.शेकटा,ता.पैठण असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या बालकांची नावे आहेत. शेकटा येथील शेतकरी मदन गवांदे,गट क्रमांक ४७ ,यांच्या शेतातील शेततळ्यात हि घटना घडली आहे.
प्रणव व आरूष हे दोघेही आजी सोबत गवत आणण्यासाठी शेतात गेले होते त्यावेळी हि घटना घडली असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.घटनेची पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश घुगे, पोलिस उपनिरीक्षक अशोक माने, पोलिस नाईक योगेश नाडे, संदिप धनेधर, अमोल मगर आदींनी धाव घेत पाहणी केली असता शेततळ्याच्या पाण्याची स्थिती पाहता अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते.
अग्निशामक दलाच्या जवानांनी तब्बल ०३ तास अथक परिश्रम घेत दोन्ही बालकांची मृतदेह पाण्याबाहेर काढले आहेत.शेततळ्याच्या आवारात शेकटा व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.दोन्ही बालकांच्या मृत्यूचे घटनेने गावात शोककळा पसरली आहे.