फरार बिझनेसमॅन ललित मोदीने लंडन स्थित भारतीय उच्चायोगात आपला पासपोर्ट सरेंडर करण्यासाठी अर्ज केला. त्याला प्रशांत महासागरातील एक देश वनुआतूची नागरिकता मिळाली आहे. पण आता त्याच्यावर मोठी कारवाई होणार आहे. वनुआतू सरकारने ललित मोदीचा पासपोर्ट रद्द करण्याचा आदेश दिला आहे. या संदर्भात वनुआतूचे पंतप्रधान जोथम नापत यांनी उच्चस्तरीय बैठक केली. आम्हाला ललित मोदींच्या कारनाम्यांबद्दल माहित नव्हतं, असं वनुआतू सरकारने म्हटलय. वनुआतूचे पंतप्रधान जोथम नापत यांनी नागरिकता आयोगाकडून ललित मोदीला जारी करण्यात आलेलं पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. ललित मोदीमुळे वनुआतूच्या गोल्डन पासपोर्ट कार्यक्रमावर वाईट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युरोपातील देश वनुआतूवर कारवाई करु शकतात असं म्हटलं जात होतं.
माजी आयपीएल अध्यक्ष ललित मोदीने भारतीय नागरिकता सोडण्यासाठी अर्ज केलाय अशी परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी पुष्टी केली होती. त्याने लंडन येथील भारतीय उच्चायोगात आपला पासपोर्ट जमा करण्यासाठी अर्ज केलाय असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल म्हणाले होते. “सध्याचे नियम आणि प्रक्रियेतंर्गत याची चौकशी होईल. वनुआतुची नागरिकता त्याने मिळवल्याच आम्हाला सांगण्यात आलय. आम्ही कायद्यानुसार त्याच्याविरोधात खटला सुरु ठेऊ” असं रणधीर जायसवाल म्हणाले होते. ललित मोदी 2010 साली भारतातून पळून गेला, तेव्हापासून तो लंडनमध्ये आहे.
वनुआतू हा देश कुठे आहे?
वनुआतू दक्षिण प्रशांत महासागरातील एक देश आहे. ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेला आणि न्यूझीलंडच्या उत्तरेला, ऑस्ट्रेलिया आणि फिजी यांच्यामध्ये हा देश आहे. पोर्ट विला ही वनुआतूची राजधानी आणि तिथलं सर्वात मोठ शहर आहे. वीजा इंडेक्सनुसार वानुअतुचा पासपोर्ट धारक 56 देशांमध्ये विनाविजा प्रवास करु शकतो. जागतिक क्रिकेटमध्ये इंडिनय प्रीमियर लीग स्पर्धेने एक वेगळी ओळख बनवली आहे. या आयपीएलची कल्पना याच ललित मोदीची होती. फुटबॉलच्या धर्तीवर त्याने या क्रिकेट लीगची सुरुवात केली.