भारतीय क्रिकेट संघाने रविवारी 9 मार्च रोजी न्यूझीलंडवर 4 विकेट्सने मात करत एकूण तिसऱ्यांदा आणि 2013 नंतर पहिल्यांचा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. भारताची ही आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची सलग दुसरी वेळ ठरली. मात्र त्यानंतर रात्री वाजून 11 वाजून 30 मिनिटांनी एका खेळाडूने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन एक पोस्ट केली. बीसीसीआयचे नियम पाहता, या पोस्टमुळे खेळाडूच्या अडचणीत वाढ झालीय, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. या खेळाडूवर बीसीसीआय बंदीची कारवाई करण्याची शक्यता आता अधिक आहे. नक्की काय झालंय? तो खेळाडू कोण आहे? हे जाणून घेऊयात.
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आता 22 मार्चपासून आयपीएलच्या 18 व्या मोसमाचा थरार रंगणार आहे. इंग्लंडचा खेळाडू आणि आयपीएलमध्ये 18 व्या मोसमासाठी दिल्ली कॅपिट्ल्सच्या गोटात असलेल्या हॅरी ब्रूक याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली. ब्रूकने आपण या हंगामात खेळणार नसल्याचं म्हणत माघार घेत असल्याचं पोस्टद्वारे जाहीर केलं. हॅरीची माघार घेण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. त्यामुळे बीसीसीआय या खेळाडूवर बंदीची कारवाई करु शकते. बीसीसीआयने काही महिन्यांपूर्वी आयपीएल स्पर्धेच्या अनुषगांने काही नियम जाहीर केले होते. त्यानुसार दुखापत आणि आजार या 2 कारणांचा अपवाद वगळता आयपीएलमधून माघार घेतल्यास बंदी घालणार असल्याचं बीसीसीआयने जाहीर केलं होतं. त्यामुळे आता हॅरी ब्रूक बीसीसीआयच्या रडारवर आहे.
अनेक खेळाडू हे स्पर्धेआधी ऐन क्षणी माघार घेतात. त्यामुळे त्याचा परिणाम होतो, अशी तक्रार आयपीएल फ्रँचायजींकूडन बीसीसीायकडे करण्यात आली होती. फ्रँचायजीच्या या तक्रारीनंतर बीसीसीआयने 28 सप्टेंबर 2024 रोजी खेळाडूंसाठी नियमावली जाहीर केली होती. यानुसार आता हॅरी ब्रूकवर 2 वर्षांची बंदीची कारवाई होऊ शकते.
“खेळाडूने मेगा ऑक्शनमध्ये सोल्ड झाल्यानंतर स्पर्धेआधी माघार घेतल्यास त्याच्यावर 2 वर्षांची बंदीची कारवाई करण्यात येईल. तसेच ऑक्शनसाठीही नाव नोंदवता येणार नाही. दुखापतग्रस्त आणि आजारी असलेल्या खेळाडूला या नियमातून सूट असेल”, अशी माहिती बीसीसीआयकडून प्रसिद्ध केलेल्या नियमावलीतून देण्यात आली होती.
हॅरीला गेल्या वर्षी दिल्लीने आपल्या गोटात घेतलं होतं. मात्र हॅरीने कौटुंबिय कारणामुळे माघार घेतली होती. तर यंदा दिल्लीने हॅरीसाठी मेगा ऑक्शनमध्ये 6.5 कोटी मोजले. मात्र हॅरीने आताही माघार घेतली आहे. त्यामुळे हॅरीवर कारवाई होणार, हे निश्चित समजलं जात आहे.
“इंग्लंड क्रिकेटसाठी हा खूप महत्त्वाचा काळ आहे. मला आगामी मालिकेसाठी तयारी करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध राहायचे आहे. मला तयारीसाठी वेळ हवा आहे, कारण मी माझ्या कारकिर्दीतील सर्वात बिजी शेड्यूलमधून जात आहे. हे प्रत्येकजण समजेलच असे नाही. तसेच मी तशी अपेक्षा करत नाही. मला जे योग्य वाटते ते करावं लागेल. माझ्या देशासाठी खेळणे हे सध्या माझं प्राधान्य आणि ध्येय आहे”, असं हॅरी ब्रूकने एक्स पोस्टमध्ये म्हटलंय.
दिल्ली कॅपिट्ल्स टीम : अक्षर पटेल, मिचेल स्टार्क, केएल राहुल, हॅरी ब्रूक, जेक फ्रेजर मॅकगर्क, टी नटराजन, करुण नायर, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल. मोहित शर्मा, फाफ डुप्लेसी, मुकेश कुमार, दर्शन नलकांडे, विपराज निगम, दुष्मंता चमीरा, माधव तिवारी, त्रिपूर्ण विजय, मानवंत कुमार, अजय मंडल आणि डोनोवन फरेरा.