माभळे पुनर्वसनातील
कॉजवे खचला
संगमेश्वर ः संगमेश्वरजवळच्या माभळे पुनर्वसनमधील वर्षभरापूर्वी बांधलेला कॉजवे (छोटा पूल) खचला असून एकूणच बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माभळे येथील झिमाजी पाताडे यांच्या घराजवळ सन २०२२-२३ मध्ये जिल्हा वार्षिक नियोजनमधून या पुलासाठी दहा लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या पुलाचे भूमीपूजन तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले होते. ठेकेदाराने दोन महिन्यात कॉजवेचे काम घाईगडबडीत केल्यानेच हा कॉजवे खचला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ठेकेदाराच्या या कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
---
सावर्डे विद्यालयात
महिलांचा सन्मान
सावर्डे ः सावर्डे येथील गोविंदराव निकम विद्यालयात विविध उपक्रमात यश मिळवलेल्या महिला व मुलींना सन्मानित करण्यात आले. भारतीय महिलांनी विविध क्षेत्रात साध्य केलेल्या प्रगतीविषयी उल्लेखनीय माहिती देणाऱ्या भित्तीपत्रकाचे उद्घाटन शिल्पा राजेशिर्के यांच्या हस्ते झाले. हे सचित्र भित्तीपत्रक श्रेया राजेशिर्के व राधिका थरवळ यांनी तयार केले. प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण व पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांनी सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. त्याचबरोबर महिलादिनी वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थिनींना गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.
---
‘राष्ट्रवादी अल्पसंख्यांक’
सेलची सदस्य नोंदणी
सावर्डे ः राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलतर्फे सदस्य नोंदणी प्रारंभ मंगळवारी (ता. ११) सकाळी साडेदहा वाजता चिपळूण येथील राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयात होणार आहे. या वेळी आमदार शेखर निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन, चिपळूण तालुकाध्यक्ष अबू ठसाळे आदी उपस्थित राहणार आहे.
---
पैशाचे पाकीट
विद्यार्थिनीकडून परत
जाकादेवी ः वाटद खंडाळा येथील गोविंद भडसावळे यांचे रत्नागिरी दरम्यानच्या प्रवासात पैशाचे पाकीट व अनेक महत्वाची कागदपत्रे असलेले पाकीट बसमध्ये हरवले होते. ते पाकीट वरवडे येथील विद्यार्थिनी आर्या गुरवला सापडले. ते तिने वाहक अमित सुपल यांना दिले. हे पाकीट खंडाळा बसस्थानकात त्यांनी जमा केले. या दोघांच्या प्रामाणिकपणाबद्दल खंडाळा ग्रामस्थांनी या दोघांचा सत्कार केला.