मोखाडा, ता. १० (बातमीदार) : आदिवासी भागात वर्षातील सर्वात मोठा होळी सण साजरा केला जातो. हा सण साजरा करण्यासाठी शेतकरी, शेतमजूर कुठेही असला तरी आपल्या गावाकडे परत येतो. या सणाला हलव्याचे दागिने (हरडे) यांना आदिवासी भागात विशेष महत्त्व आहे. अवघ्या दोन दिवसांवर होलिकोत्सव (शिमगा) येऊन ठेपला आहे. त्यामुळे मोखाडा तालुक्यातील बाजारपेठा हरड्या-करड्यांनी सजल्या आहेत, मात्र बाजारपेठेत मंदीचे सावट असल्याने दुकानदारांना ग्राहकांची प्रतीक्षा आहे.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांत होळी सणांचे परंपरागत विशेष महत्त्व आहे. हा सण शेतमजूर, शेतकरी यासह सर्वच स्तरातील नागरिक आनंदाने साजरा करतात. त्यासाठी परंपरागत पद्धतीने हलव्याचे दागिने (हरडे, करडे) अंगावर घालण्याची, तसेच होळीला नैवेद्य देण्याची, तसेच गोडधोड करण्याची या भागातील प्रथा आहे. त्यासाठी रवा, मैदा, गूळ, साखर आणि खोबरे व नारळाला जास्त मागणी असते. त्यामुळे मोखाड्यातील खोडाळा आणि मोखाडा या बाजारपेठांसह गावोगावचे आठवडे बाजारातील दुकाने गोडधोड बनवणाऱ्या वस्तूंसह हरड्या-करड्यांनी सजली आहेत.
स्थलांतरित मजुरांमुळे आणि मनरेगाची मजुरी सरकार दरबारी थकल्याने बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ कमी दिसून येते. मोठे भांडवल गुंतवणूक करून हरडे-करड्यांचे दुकान थाटून बसलेल्या दुकानदारांना ग्राहकांची प्रतीक्षा लागली आहे. या भागातील शिमगोत्सव पूर्वी आठ दिवस चालत होता, मात्र आधुनिक काळात या सणाची केवळ औपचारिकताच राहिली आहे. एक ते दोन दिवसात सण साजरा करून मजूर पुन्हा शहराची वाट धरत आहेत.
मजुरांच्या कुटुंबांना दिलासा
सरकारने महिलादिनापूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यात मदत जमा करण्याची घोषणा केली. हे पैशांतून मनरेगाची मजुरी रखडलेल्या मजुरांच्या कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. त्यांना या पैशांतून शिमगोत्सव साजरा करण्याची आशा निर्माण झाली आहे.
तुलनेने यंदा गोडधोडाच्या वस्तू महागल्या....
गतसालच्या तुलनेने गोडधोड बनवण्याच्या वस्तुंना महागाईचा तडका बसला आहे. किरकोळ बाजारात खोबरे - २४० रुपये, हारडे - २००, गूळ - ५० ते ५५, साखर - ४४ आणि रवा - ५० रुपये किलोने विक्री केला जात आहे. गतसालच्या तुलनेने खोबरे ५० रुपये, हारडे ३०, गूळ पाच ते सात, साखर चार आणि रवा १० रुपयांनी महागला आहे.
होळी सणांसाठी व्यापाऱ्यांनी भरगच्च दुकाने भरून माल ठेवला आहे, मात्र ग्राहकांची वानवा आहे. यंदा गतसालच्या तुलनेने किराणा महागला आहे. स्थलांतरित मजूर गावाकडे परतल्यावर बाजारपेठेत गर्दी होण्याची अपेक्षा आहे. तसेच सरकारकडून लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशांमुळे बाजारपेठेत रेलचेल निर्माण होण्याची आशा आहे.
- विजय भागवत, किराणामाल व्यापारी, खोडाळा