Vishnu Manohar: प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचं फेसबुक अकाऊंट हॅक! पत्रकार परिषदेत रडू कोसळलं; अश्लिल कंटेन्ट...
esakal March 11, 2025 08:45 AM

Vishnu Manohar: नागपूरातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांची ख्याती साता समुद्रापार पोहोचलेली आहे. मात्र, त्यांच्या 'मास्टर रेसिपी बाय विष्णू मनोहर' हे फेसबुक पेज हॅक करण्यात आलं आहे. ज्या पेजवर रेसिपी पोस्ट केल्या जात होत्या त्यावर अचानक अश्लील कंटेन्ट पोस्ट केला जात असल्यानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना रडूच कोसळलं. नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात.

फेसबूक पेज हॅक झाल्याची तक्रार विष्णू मनोहर यांनी सायबर पोलिसांकडं दिली होती. मात्र, दहा ते बारा दिवस लोटून अद्यापही त्यांचं पेज रिकव्हर करण्यात न आल्यामुळं या पेजवरुन अश्लिल कंटेट सातत्यानं पोस्ट होत आहे. याचाच मानसिक त्रास सहन होत नसल्याचं सांगताना विष्णू मनोहर यांना भर पत्रकार परिषदेत रडू कोसळलं.

दरम्यान, यासंदर्भात त्यांनी नागपूर, बंगळूर, मुंबई, पुणे, तसंच अमेरिकेतही फेसबुककडे यासंदर्भात तक्रार दिलेली आहे. फेसबुकची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटाशीही त्यांनी संपर्क साधला. मात्र, अद्याप हे अकाउंट रिकव्हर होऊ शकलेलं नाही. या 2,000 रेसिपी असलेल्या पेजवर लाखो फॉलॉवर्स होते. मात्र, गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये फॉलोवर्सची संख्या घटली आहे. युजर्स या पेजला अनफॉलो करत आहेत. तसंच अनेक जण त्यांना फोन आणि मेसेजद्वारे सातत्यानं होत असलेल्या अश्लील पोस्टबाबत प्रश्नही विचारत आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

या लिंकवर क्लीक केल्यास संबंधित व्यक्तीचं अकाउंट हॅक होऊ शकतं. त्यामुळं माझं फॉलोवर्सना आवाहन आहे की त्यांनी या लिंकवर क्लीक करु नये, असं विष्णू मनोहर यांनी म्हटलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.