WPL 2025: मुंबई इंडियन्सचा गुजरातवर रोमांचक विजय, आता थेट फायनल गाठण्याची संधी; अमरावतीच्या भारतीची वादळी फिफ्टी मात्र व्यर्थ
esakal March 11, 2025 09:45 AM

वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील १९ वा सामना सोमवारी (१० मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स संघात पार पडला. या दोन्ही संघांनी प्ले ऑफमधील स्थान आधीच पक्के केले आहे. पण पाँइंट्स टेबलमध्ये पहिले स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा आहे. अशात आता मुंबईने रोमांचक सामन्यात ९ धावांनी विजय मिळवला.

या विजयामुळे आता त्यांचेही १० गुण झाले असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पण त्यांचा आणखी एक साखळी सामना बाकी आहे. पहिल्या क्रमांकावर १० गुणांसह दिल्ली कॅपिटल्स आहेत. पण दिल्लीचे सर्व साखळी सामने झाले आहेत.

त्यामुळे आता मुंबईला उर्वरित सामना जिंकून पहिला क्रमांक मिळवून थेट अंतिम सामन्यात पोहचण्याची संधी असणार आहे. गुजरातचेही सर्व ८ साखळी सामने झाले असून ते ८ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

या सामन्यात गुजरातसमोर विजयासाठी १८० धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातला २० षटकात सर्वबाद १७० धावाच करता आल्या.

१८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. सुरुवातीच्या १० षटकात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. चौथ्याच षटकात बेथ मुनीला हेली मॅथ्युजने ७ धावांवर बाद केले. ६ व्या षटकात काशवी गौतम १० धावांवर बाद झाली.

गुजरातची कर्णधार ऍश्ले गार्डनरही खास काही करू शकली नाही. तिला शबनीम इस्माईलने दुसऱ्याच चेंडूवर शुन्यावर हेली मॅथ्युजच्या हातून झेलबाद केले. हर्लिन देओलही ९ व्या षटकात २४ धावा करून बाद झाली. त्यामुळे गुजरातची अवस्था ४ बाद ५४ धवा अशी झाली होती.

तरी फोबी लिचपिल्ड आणि डिओंड्रा डॉटिनने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, या दोघीही मोठी खेळी न करताच परतल्या. ११ व्या षटकात लिचफिल्डला शबनीम ईस्माइलने २२ धावांवर त्रिफळाचीत केले. डिएंट्रा डॉटिनला १० धावांवर एमेलिया केरने १४ व्या षटकात त्रिफळाचीत केले.

यानंतर मात्र अमरावतीच्या भारती फुलमालीचा आक्रमक अवतार पाहायला मिळाला. तिने मुंबईच्या गोलंदाजावर हल्ला चढवत गुजरातच्या विजयाच्या आशा उंचावल्या. तिला दुसऱ्या बाजूने सिमरन शेखने साथ दिली होती. भारतीने वादळी अर्धशतकही केले.

पण अखेर १७ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एमेलिया केरने जी कामिलिनीच्या हातून झेलबाद केले. भारती २५ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांसह ६१ धावा करून बाद झाली. ती बाद झाली तेव्हा गुजरातला १८ चेंडूत ३८ धावांची गरज होती.

ती बाद झाल्यानंतर तनुजा कन्वर आणि सिमरन यांनीही आक्रमक खेळत गुजरातला विजयाच्या आणखी जवळ नेले होते. शेवटच्या षटकात गुजरातला १३ धावांची गरज होती.

त्यावेळी पहिल्याच चेंडूवर तनुजा ६ चेंडूत १० धावा करून धावबाद झाली. तिला मॅथ्युजने धावबाद केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर सिमरन शेखही १७ धावांवर त्रिफळाचीत झाली. त्यांनंतर मात्र शेवटच्या चेंडूवर प्रिया मिश्राही १ धावेवर यष्टीचीत झाली. त्यामुळे गुजरातच डावही संपला.

मुंबईकडून गोलंदाजी करताना एमेलिया केर आणि हेली मॅथ्युज यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच शबनीम ईस्माइलने २ विकेट्स घेतल्या, तर संस्कृती गुप्ताने १ विकेट घेतली.

तत्पुर्वी, गुजरातने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. मुंबईकडून हेली मॅथ्यूज आणि एमेलिया केर फलंदाजीला उतरली. पण केरला तिसऱ्याच षटकात ऍश्ले गार्डनरने त्रिफळाचीत केले. केरने ५ धावा केल्या. पण त्यानंतर काही वेळ हेली मॅथ्यूज आणि नतालिया सायव्हर-ब्रंट यांनी डाव पुढे नेला.

मात्र मॅथ्युज २७ धावांवर बाद झाली. पण त्यानंतर आलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौरने आक्रमक खेळ केला आणि अर्धशतक ठोकले. यादरम्यान नतालियाही ३८ धावांवर बाद झाली. अमनज्योत कौरने २७ धावांची खेळी केली. हरमनप्रीत कौरने ३३ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. तिने ९ चौकार मारले.

शेवटी सजीवन सजना आणि यास्तिका भाटिया यांनी मुंबईला २० षटकात ६ बाद १७९ धावांपर्यंत पोहचवले. यास्तिका शेवटच्या चेंडूवर धावबाद झाली. तिने १३ धावा केल्या. सजीवन सजना ११ धावांवर नाबाद राहिली.

गुजरातकडून गोलंदाजी करताना तनुजा कन्वर, काशवी गौतम, प्रिया मिश्रा आणि ऍश्ले गार्डनर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.