सद्गुरू
सद्गुरू : शोध घेणे म्हणजे काय? शोध घेणे म्हणजे जिथे तुम्ही कधीच गेला नाहीत अशा क्षेत्रांमध्ये प्रवेश करणे. शोध ही एक कल्पना नाही. जर तुम्ही घरी बसून आफ्रिका खंडाचा शोध घेत आहात, तर त्याला कल्पना म्हणतात. तुम्ही आफ्रिका खंडात जाऊन त्या खंडातून चालत फिरलात, त्याला शोध म्हणतात. यात खूप मोठा फरक आहे.
जीवन इतके लहान आहे, की त्याचा सारांश तुम्ही अगदी थोडक्यात करू शकत असाल आणि एखाद्या अर्थहीन स्थितीतून जात आहात जिचा सारांश तुम्ही दहा मिनिटांत करू शकत असाल, तर इतकी वर्षं इथे जगणे अगदीच व्यर्थ आहे. तुम्ही जीवनाचा केवळ शोध आणि शोध घेत राहू शकता. तुम्ही कधीही त्याचा सारांश करू शकत नाही. तुम्ही त्याचा सारांश केलात, तर त्याचा अर्थ तुम्ही संपूर्ण मुद्दा समजू शकला नाहीत. विचारसरणी नव्हे तर शोध आवश्यक आहे. विचारसरणी म्हणजे तुम्ही जीवनाचा सारांश केला आहे. आपण जीवनाचा सारांश करू नये.
जीवनात सुरक्षिततेचा शोध घेणे हा शोध घेण्यातला सर्वांत मोठा अडथळा आहे. प्रवाही आणि गतिमान असण्याऐवजी, तुमच्याकडे जे काही थोडेफार आहे ते, तुम्हाला घट्ट आणि ठोस करायचे असते. जीवन साचून राहते, तेव्हा ते भयानक बनते. मग तुमच्यासोबत असे घडेल, की तुम्ही कधीही मनापासून मोठमोठ्याने रडणार नाही किंवा पूर्णपणे हसणारदेखील नाही. तुमचे अश्रू सांडणार नाहीत किंवा तुमचे हास्यदेखील खुलणार नाही. तुम्ही एका अधांतरी अवस्थेत जाल. तुम्ही जीवन पूर्णत्वाने जगलात, तर ते उत्तम आहे. तुम्ही जगलात आणि नंतर मरून पडलात, तर ते ठीक आहे; पण अधांतरी अवस्थेत, तुम्ही जिवंत देखील नसता आणि मृत देखील नसता; तुमचे मरण येते, तेव्हा तुम्हाला जाणवते की तुम्ही न जगताच मरत आहात. ही एक शोकांतिका आहे. तुम्ही पाहाल, जगातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोक अशाच प्रकारे मरतात.
मरणासन्न अवस्थेतील लोकांकडे पाहिले, तर ते ७० किंवा ८० वर्षे जगलेले असतात, आणि मृत्यूचा क्षण येतो, अंतिम क्षण, तुम्ही पाहाल, की त्यांचे चेहरे गांगरलेले आहेत. ते गांगरलेले आहेत, कारण ते न जगताच मरत आहेत. जीवनाचा एक कणभर देखील माहीत न होता ते जात आहेत. तुम्ही उल्हासात आणि आनंदाने मरणाला सामोरे जात असाल तर ते विलक्षण आहे. किंवा तुम्ही किमान शांतपणे मृत्यूला सामोरे जात असाल तर ते ठीक आहे; पण तुम्ही गांगरून मरत असाल, तर याचा अर्थ तुम्ही न जगताच मरत आहात. ही सर्वांत भयानक गोष्ट आहे. कोणीही गांगरून मृत्यूला सामोरे जावे अशी माझी इच्छा नाही.