Train hijack in Pakistan: पाकिस्तानमधील परिस्थिती दिवसंदिवस गंभीर होत आहे. आता पाकिस्तानमधील बलोच आर्मीने संपूर्ण ट्रेनच हायजॅक केली. दशतवाद्यांनी रेल्वेतील 120 जणांना ओलीस ठेवले आहे. त्यात आयएसआय आणि पाकिस्तानी लष्काराचे कर्मचारी आहेत. रेल्वेला अपहरणकर्त्यांकडून सोडवण्यासाठी गेलेल्या पाकिस्तानी लष्करातील सहा सैनिकांचा मृत्यू झाला आहे. सैन्य कारवाई केली तर प्रवाशांना ठार करण्यात येईल, असा इशारा बलोच आर्मीने दिला आहे.
ओलिसांमध्ये पाकिस्तानी लष्कर, पोलीस, दहशतवाद विरोधी दल (एटीएफ) आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) चे कर्मचारी आहेत. हे सर्वजण रजेवर पंजाबला जात होते. ट्रेनमध्ये उपस्थित सैनिकांनी कोणतीही कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास सर्व ओलीस ठार केले जातील, असा इशारा बीएलएने दिला आहे.
दरम्यान, रेल्वेचे अपहरण केल्यानंतर बलोच आर्मीने महिला, मुले यांना सोडून दिले. माहितीनुसार, बीएलएची फिदायन युनिट, मजीद ब्रिगेड या मोहिमेचे नेतृत्व करत आहे. ज्यामध्ये फतेह पथक, एसटीओएस आणि गुप्तचर शाखा जिराब यांचा समावेश आहे.
रेल्वे हायजॅक केल्यानंतर बलोचिस्तान लिबरेशन आर्मीने वक्तव्य दिले आहे. आमच्या सैनिकांनी आधी ट्रेनचे ट्रॅक बॉम्बने उडवले. त्यामुळे रेल्वे थांबली. रेल्वे थांबताच्या आमच्या सैनिकांनी ट्रेन संपूर्ण नियंत्रण घेतले. पाकिस्तानी लष्कर काही कारवाई करण्याचा विचार करत असेल तर ओलीस ठेवलेले 120 प्रवाशी वाचणार नाही.
बलोच आर्मीने पाकिस्तान लष्कराला गंभीर इशारा दिला आहे. आमच्याविरोधात लष्करी कारवाई केली तर त्याचे गंभीर परिणाम होतील. आमच्यावर हल्ला झाला तर सर्व 120 प्रवाशी मारले जातील. त्याची संपूर्ण जबाबदारी पाकिस्तानी लष्काराची असणार आहे.
बलुचिस्तानमधील फुटीरतावादी संघटना अनेक दिवसांपासून पाकिस्तानविरोधात लढा देत आहेत. हा भाग अतिरेकी कारवायांचे केंद्र बनला आहे, जिथे पाकिस्तान सरकारवर सातत्याने हल्ले होत आहेत. काही दिवसांपूर्वी बलुच गटांनी पाकिस्तान आणि चीनविरोधात नव्याने हल्ला करण्याची घोषणा केली होती. बलुच गटाने अलीकडेच सिंधी फुटीरतावादी गटांसोबत युद्ध सराव पूर्ण केला होता.