- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक
तू खुद की खोज में निकल
तू किस लिए हताश हैं,
तू चल तेरे वजूद की
समय को भी तलाश हैं
तन्वीर गाजी यांच्या एका गाजलेल्या कवितेतील काही ओळी. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आवाजात म्हटल्याने तर फारच प्रसिद्ध झाल्या आहेत. आमच्या राजूनेही या ओळी ऐकल्या होत्या. त्याला एकदम ते आठवले. माझ्याकडे धावतच येऊन म्हणाला की, ‘माझ्या मनासमोर असे तरळून गेले की ‘5S’ ही कार्यप्रणाली मन व्यवस्थापनासाठीही उपयुक्त ठरू शकते.’
‘खुद की खोज में निकलनेकी..’ अशीच प्रक्रिया असेल ही.’ मी राजूला दुजोरा दिला.
उद्योग व्यवस्थापनेमध्ये कार्यक्षमता, उत्पादकता वाढणे, टाकाऊ वस्तू कमी करणे, कचरा फेकून देणे आणि कामाच्या ठिकाणाचे उत्तम व्यवस्थापन, शिस्त, वस्तू जागच्या जागी हव्या त्या नेमक्या वेळी सापडणे असे अनेक फायदे ‘5S’ या कार्यप्रणालीने सिद्ध केलेले आहेत.
‘या पद्धतीचा मर्त्य मानवाला उपयोग कसा करून घ्यायचा?’’ राजू विचारता झाला.
‘तुला माहीत आहे की कोरोनानंतर तणाव व्यवस्थापनासाठी ‘माईंडफुलनेस’चा अभ्यास आणि सराव करतोय. एके दिवशी, अशा निष्कर्षापर्यंत आलो की ‘5S’ हे प्रकरण तू म्हणतोस तसे स्वशोधासाठी व व्यक्तिमत्त्व विकासासाठी नक्कीच पडेल. म्हणून तुला आधी ‘स्वॉट ॲनॅलिसिस’ची प्रक्रिया समजावली ना?
‘5S’ आणि ‘स्वॉट ॲनॅलिसिस हे दोन्ही स्वशोध उपाय समांतर पद्धतीने वापरले तर जास्त प्रभावी ठरतील असा मला साक्षात्कारच झाला. पुढच्या काही भागात हे पाचही ‘एस’ उलगडून बघू. तत्पूर्वी तुझी ‘लर्निंग-अनलर्निंग’ आणि ‘रिलर्निंग’ची मनोभूमिका तयार झाली किंवा नाही हे बघण्यासाठी तुला एक गोष्ट सांगितली होती. ती तुला आठवत असेल तर सांग पाहू.’ थोडा वेळ विचार करून राजू सांगू लागला.
‘एकदा एका झेन गुरूकडे, एक योद्धा तलवारबाजी शिकण्यास गेला. तेव्हा झेन गुरू चहा पीत होता. चहा घेता-घेता त्याने त्या योद्ध्याला विचारले की, तुला काय येते?’
तसा योद्धा उद्गारला ‘बहुतेक तर सगळे डावपेच येताहेत. तुमच्याकडे काही नवीन असेल तर शिकायचे आहे.’
‘बर ते बघू नंतर, सध्या तू पण निवांत बसून चहा घे.’
झेन गुरू त्याच्या कपात चहा ओतू लागले. कप पूर्ण भरून बशीत आणि नंतर जमिनीवर चहा सांडायला लागला. तसा तो योद्धा अस्वस्थ झाला.
‘गुरुजी कपबशी दोन्ही ओसंडून वाहताहेत. तरी तुम्ही ओततच आहात? त्याच्यात अजून चहा कसा मावणार?’
‘हो ना, बघ आता तूच, तू पण असाच ओतप्रोत भरला आहेस. मी तुला नवीन काय शिकवणार? रिता असतास तर काहीतरी शिकवले असते.’
योद्धा, खजिल झाला. काय समजायचे ते समजला.
‘कळले तुला?’ मी राजूला विचारले.
‘हां स्वयंमूल्य निर्धारणासाठीही आधी मनाची पाटी कोरी करून, स्वतःतच विलीन होऊन कठोर आत्मपरिक्षण करावयास हवे.’
शाब्बास असे म्हणून मी राजूला ‘5S’ बद्दल माहिती द्यायला लागलो.