सोलापूर : कागदपत्रांमध्ये सवलत, पडताळणीकडे दुर्लक्ष करुन अर्ज करेल त्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला. पण, आता योजनेच्या निकषांवर बोट ठेवून लाभार्थींची पडताळणी सुरू झाली आहे. त्यात चारचाकी वाहनधारक, नमो शेतकरी महासन्मान योजना, संजय गांधी निराधार योजना व प्रधानमंत्री स्वनिधी योजना, अशा शासनाच्या वैयक्तिक योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे दीड लाख महिला आहेत. त्यांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असल्यास आता योजनेच्या संकेतस्थळावरून कोणीही तक्रार करू शकणार आहे. तसा पर्याय (तक्रार) उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यावर ज्या लाडक्या बहिणींना अर्ज करुनही लाभ मिळालेला नाही किंवा योजनेचा लाभ नाकारायचा आहे, त्यासाठी देखील पर्याय आहे. योजनेच्या लाभार्थी महिलांची निकषांनुसार पडताळणी सुरू झाल्यावर मागील दीड महिन्यात जिल्ह्यातील ८३ महिलांनी स्वत:हून अर्ज करून ‘लाभ नको’ असे लेखी दिले आहे.
लाभ नाकारण्यासाठी आता प्रत्यक्ष जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात येऊन अर्ज करण्याऐवजी योजनेच्या संकेतस्थळावरुन अर्ज करता येणार आहे. दरम्यान, अजूनही अनेक महिला निकषांनुसार अपात्र असूनही पुढे आलेल्या नाहीत, त्यांना आपला लाभ सुरूच राहील, अशी खात्री वाटत आहे. पण, अपात्र असलेल्यांची पडताळणी आगामी काळात निश्चित होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
योजनेच्या संकेतस्थळावर करता येणार तक्रार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार पात्र- अपात्र कोण यादृष्टीने पडताळणी सुरू आहे. याशिवाय आता योजनेच्या पोर्टलवर तक्रार करण्याचाही पर्याय उपलब्ध असेल आणि लाभार्थी महिलेला लाभ नाकारायचा असेल किंवा लाभ मिळाला नसेल तरी त्या तक्रारी करु शकणार आहेत.
- रमेश काटकर, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, सोलापूर
जिल्ह्यातील लाडक्या बहिणी
एकूण लाभार्थी
११,०९,४८७
लाभासाठी दरमहा निधी
१६६.४२ कोटी
स्वत:हून लाभ नाकारणाऱ्या
८३
पडताळणीअंती लाभार्थीत घट
अंदाजे १.०९ लाख