चॅम्पियन्स ट्रॉफी विजयापूर्वी प्रशिक्षक गौतम गंभीरवर चोहूबाजूने टीका होत होती. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत धोबीपछाड मिळाला होता. त्यात चॅम्पियन्स ट्रॉफी गमावली असती तर टीकेचा धनी ठरला असता. पण टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीत चमकदार कामगिरी करत जेतेपद मिळवलं. चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवल्यानंतर गौतम गंभीरचं काम संपलं असं कसं होईल. गौतम गंभीर आता पुढच्या तयारीला लागला आहे. टी20 वर्ल्डकप 2026 आणि वनडे वर्ल्डकप 2027 ची तयारी सुरु केली आहे. दुसरीकडे, कसोटीत भारताला मजबूत करण्यासाठी आतापासूनच धडपड सुरु केली आहे. यासाठी गौतम गंभीर टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर एकत्र जाणार नाही. त्याऐवजी गौतम गंभीरने इंडिया ए संघासोबत इंग्लंड दौऱ्याला सुरुवात करणार आहे. भारताचा इंग्लंड दौरा 20 जूनपासून सुरु होणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या मालिकेपूर्वीच गौतम गंभीर इंडिया ए संघासोबत इंग्लंडला रवाना होईल. पहिल्यांदाच सीनियर टीमचा मुख्य प्रशिक्षक इंडिया ए संघासोबत जाणार आहे.
गौतम गंभीर भविष्यातील टीम बांधण्याच्या हेतूने इंडिया ए संघासोबत जाणार आहे. यात टी20 वर्ल्डकप 2026, वनडे वर्ल्डकप 2027 आणि रेड बॉल क्रिकेटची ताकद तपासणार आहे. टीम इंडिया इंग्लंड येण्यापूर्वीच खेळपट्टी आणि तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणार आहे. त्यामुळे कसोटी मालिकेत योग्य तो निर्णय घेता येईल. रिपोर्टनुसार, गौतम गंभीरने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यानंतर बीसीसीआयला याबाबत सांगितलं होतं. गंभीरने बोर्डाला सांगितलं होतं की, राखीव खेळाडूंचा एक चांगला गट बनवायचा आहे. टाइम्स ऑफ इंडियाने बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लिहिलं की, गंभीरचा हेतू वाइल्ड कार्ड प्लेयर्स तयार करण्याचा आहे. जे भविष्यात टीम इंडियाला जिंकवू शकतात.
आयपीएल 2025 स्पर्धा संपल्यानंतर टीम इंडिया जवळपास 20 ते 25 दिवस आराम करेल. त्यानंतर 20 जूनपूर्वी इंग्लंडला रवाना होईल. पण गौतम गंभीर आधीच इंग्लंडला असणार आहे. टीम इंडिया तिथे पोहोचताच त्यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात करेल. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारताने दोन कसोटी मालिका गमावल्या आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपच्या चौथ्या पर्वाची सुरुवात भारत इंग्लंड दौऱ्यापासून करेल. कसोटी मालिका 20 जून ते 4 ऑगस्टपर्यंत असणार आहे.