Latest Maharashtra News Updates : शक्तिपीठ महामार्गाविरोधात इंडिया आघाडीची आज मुंबईत धडक; विधिमंडळावर काढणार मोर्चा
esakal March 12, 2025 05:45 PM
Gram Panchayat Election LIVE : कोल्हापुरातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ, 26 मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार

कोल्हापूर : जिल्ह्यातील एक हजार ६७३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. मतदार यादी बनविण्याचे काम सुरू असून, १९ मार्चला प्रारूप मतदार यादी जाहीर होणार असून, २६ मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी काढले. जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत राज्यातील एक हजार ६७३ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. तसेच विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य, सरपंच पदासाठी पोटनिवडणूकही होणार आहे. प्राथमिक टप्प्यावर मतदार यादीचा कार्यक्रम राबविण्याचा अध्यादेश शासनाने सोमवारी काढला आहे. त्यानुसार ग्रामपंचायत विभागातर्फे कामकाज सुरू झाले आहे. प्रारूप मतदार यादी १९ मार्चला प्रसिद्ध होणार आहे. हरकती व सूचना दाखल करण्यासाठी १९ ते २४ मार्च हा कालावधी आहे.

Bangalore Rain LIVE : पहिल्या पावसामुळे बंगळूरच्या तापमानात घट

बंगळूर : कडक उन्हाने त्रस्त झालेल्या सिलिकॉन सिटी बंगळूरमध्ये अखेर मंगळवारी पाऊस झाला. संध्याकाळी मार्च महिन्यातील पहिला पाऊस पडला. ज्यामुळे शहरातील तापमानात लक्षणीय घट झाली. संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बंगळूरच्या अनेक भागात पाऊस झाला. शांतीनगर, कॉर्पोरेशन, रिचमंड सर्कल, के. आर. मार्केट आणि मॅजेस्टिक यांचा समावेश आहे. पावसाळी ढग ईशान्य बंगळूरपासून दक्षिणेकडे सरकत आहेत. परिणामी, हालसुरू, इंदिरानगर, बनशंकरी आणि जयनगरमध्येही पाऊस पडत असल्याचे वृत्त आहे.

Nitesh Rane LIVE : हलाल खाणे हिंदू धर्मात लिहिलेले नाही, तर इस्लाम धर्मात..; मल्हार प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर काय म्हणाले राणे?

मुंबई : मल्हार प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर मंत्री नितेश राणे म्हणाले, "हिंदुत्व विचारसरणीचे पालन करणारे कामगार आता एकत्र आले आहेत आणि त्यांच्या हक्कांसाठी, हिंदू समाजासाठी मटणाचा एक चांगला पर्याय घेऊन आले आहेत. वर्षानुवर्षे फक्त हलाल मटणच खावे, अशी सक्ती केली जात आहे. एकतर हलाल खा, नाहीतर तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही. आम्ही त्यासाठी एक चांगला पर्याय आणला आहे. हलाल खाणे हे हिंदू धर्मात लिहिलेले नाही, तर इस्लाम धर्मात लिहिलेले आहे. म्हणून, जर कोणी असा चांगला पर्याय आणत असेल तर मी त्यांना पाठिंबा देत आहे."

Ukraine Russia War : युक्रेनने युद्धबंदी प्रस्तावाला दिली मान्यता, अमेरिका पुन्हा सुरक्षा मदत सुरू करणार

युक्रेनने काल (मंगळवार) अमेरिकेने प्रस्तावित केलेल्या तात्काळ 30 दिवसांच्या युद्धबंदीला मान्यता देण्याची घोषणा केलीये. याशिवाय, रशियासोबत शांतता प्रस्थापित करण्यासाठी तातडीने चर्चा सुरू करण्यावरही सहमती दर्शवलीये. सौदी अरेबियातील जेद्दाह येथे अमेरिका आणि युक्रेनियन अधिकाऱ्यांमध्ये नऊ तासांहून अधिक काळ झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.

Shivaji University Exam LIVE : शिवाजी विद्यापीठात पदवी परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

कोल्हापूर : मार्च - एप्रिल या उन्हाळी सत्रात होणाऱ्या पदवी परीक्षेचा अर्ज भरण्यास शिवाजी विद्यापीठाने मुदतवाढ दिली आहे. या अंतर्गत विलंब शुल्कासह अर्ज करण्यास १७ मार्चपर्यंत मुदत आहे. कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेतील पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात अथवा पदव्युत्तर अधिविभागामध्ये परीक्षा अर्ज विनाविलंब शुल्कासह भरण्याची मुदत १३ मार्चपर्यंत आहे. विलंब शुल्कासहित भरण्याची मुदत १४ आणि १५ मार्चदरम्यान आणि अतिविलंब शुल्कासमवेत अर्ज भरण्यासाठी मुदत १६ आणि १७ मार्चपर्यंत आहे. विद्यार्थी हितास्तव या परीक्षांचे अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे.

Pakistan Train Hijack : बलुच बंडखोरांकडून पाक रेल्वेचे अपहरण, वीस सैनिकांना मारले; 182 ओलिस

कराची : स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणाऱ्या ‘बलुच लिबरेशन आर्मी’च्या (बीएलए) बंडखोरांनी आज बोलान प्रांतामध्ये पाकिस्तानच्या जाफर एक्स्प्रेसवर हल्ला करत तिचे अपहरण केले. बंडखोरांनी या गाडीतील तब्बल १८२ प्रवाशांना ओलिस ठेवले असून, पाकच्या २० सैनिकांची हत्या केली आहे.

Reserve Bank of India LIVE : भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच शंभर-दोनशेच्या नव्या नोटा जारी करणार

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असलेल्या १०० आणि २०० रुपयांच्या नोटा जारी करणार आहे. या नोटांची रचना महात्मा गांधी (नवीन) मालिकेतील १०० आणि २०० रुपयांच्या नोटांसारखीच आहे, असे रिझर्व्ह बँकेने एका निवेदनात म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेने पूर्वी जारी केलेल्या १०० आणि २०० रुपयांच्या सर्व नोटा कायदेशीर चलन म्हणून कायम राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. संजय मल्होत्रा यांनी डिसेंबर २०२४ मध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला.

Shaktipeeth Highway LIVE : शक्तिपीठ महामार्गाविरोधात इंडिया आघाडीची आज मुंबईत धडक; विधिमंडळावर काढणार मोर्चा

Latest Marathi Live Updates 12 March 2025 : शक्तिपीठ मार्गाविरोधात इंडिया आघाडीतर्फे आज मुंबईतील आझाद मैदानावरून विधिमंडळावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असलेल्या १०० आणि २०० रुपयांच्या नोटा जारी करणार आहे. प्रशांत कोरटकर याने नागपूर सायबर पोलिसांकडून जुना राजवाडा पोलिसांना पाठविलेल्या मोबाईलमधील ‘डेटा’ डिलिट केला असल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी न्यायालयात केला. विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या २७ मार्चला निवडणूक आहे. त्यात एक रिक्त जागा ही आमदार गोपीचंद पडळकर यांची आहे. त्या जागेवर भाजप निष्ठावंताला संधी देणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात आता बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.