भारतीय क्रिकेट संघाने 9 मार्चला अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवून चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाची ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची तिसरी वेळ ठरली. टीम इंडियाने यासह क्रिकेट चाहत्यांची 12 वर्षांची प्रतिक्षा संपवली. टीम इंडियाने याआधी 23 जून 2013 रोजी महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात इंग्लंडला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली होती. तर 2002 साली टीम इंडिया आणि शेजारी श्रीलंका हे दोघे संयुक्त विजेता ठरले होते.
भारतीय क्रिकेट संघाने दुबईत झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर मात करण्यासह 25 वर्षांपूर्वीच्या पराभवाची परतफेडही केली आणि हिशोब बरोबर केला. याच न्यूझीलंडने टीम इंडियाला 2000 साली चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये (आयसीसी नॉकआऊट) पराभूत केलं होतं. रोहितसेनेने हा वचपा काढला. कर्णधार रोहितला या ऐतिहासिक विजयानंतर आयसीसीकडून गोड बातमी मिळाली आहे.
आयसीसीने नेहमीप्रमाणे या बुधवारीही एकदिवसीय क्रमवारी अर्थात वनडे रँकिंग जाहीर केली आहे. रोहितला या बॅटिंग रँकिंगमध्ये फायदा झालाय. रोहितने फायनलमध्ये 76 धावांची स्फोटक खेळी केली होती. रोहितला या खेळीमुळे रँकिंगमध्ये बुस्टर मिळालं आहे. रोहितने 2 स्थानांची झेप घेतली आहे. रोहित पाचव्या स्थानावरुन तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. रोहितच्या खात्यात 756 रेटिंग पॉइंट्स आहेत.
दुसऱ्या स्थानी पाकिस्तानचा बाबर आझम आहे. तर टीम इंडियाचा उपकर्णधार शुबमन गिल यालने त्याचं अव्वल स्थान कायम राखलं आहे. शुबमन 784 रेटिंगसह नंबर 1 आहे.
आयसीसीकडून एकदिवसीय क्रमवारी जाहीर
रोहितने अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 252 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला स्फोटक सुरुवात करुन दिली होती. रोहितने शुबमनसह सलामी शतकी भागीदारी केली होती. तसेच रोहितने 7 फोर आणि 3 सिक्ससह 76 धावांची खेळी केली होती. त्याचाच फायदा रोहितला झाला.