पाकिस्तानात अख्खी ट्रेन कशी झाली हायजॅक? जाफर एक्सप्रेसचा पहिला व्हिडीओ समोर
GH News March 12, 2025 10:11 PM

बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) काल पाकिस्तानात एक ट्रेन हायजॅक केली आहे. त्यामुळे पाकिस्तानातच नव्हे तर संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. अतिरेक्यांच्या ताब्यातून ट्रेन सोडवण्याचा प्रयत्न पाकिस्तानी सैन्याकडून होत असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. बीएलएने जाफर एक्सप्रेस कशी हायजॅक केली, याचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. दरम्यान, अतिरेक्यांच्या ताब्यात असलेल्या प्रवाशांना सोडवण्यासाठी पाकिस्तानी सुरक्षा दलाने जीवाचं रान सुरू केलं आहे. सुरक्षा दलाने आतापर्यंत कमीत कमी 27 दहशतवादी ठार केले आहेत. तर 155 प्रवाशांना वाचवलं आहे.

पाकिस्तानी सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये कालपासून चकमक सुरू आहे. आजही ही चकमक सुरू होती. बलूच आर्मीने पाकिस्तानी सरकारला 48 तासाचा अल्टिमेटम दिला आहे. बलूच कैद्यांना सोडण्यासाठीचा हा अल्टिमेटम आहे. हायजॅक केलेल्या ट्रेनला अतिरेक्यांच्या तावडीतून सोडवण्याचे पाकिस्तानचे चार प्रयत्न फेल ठरले आहेत. गेल्या 24 तासातच पाकिस्तानी सैन्याने अतिरेक्यांपुढे स्वत:ला सरेंडर केलं आहे. या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानी सैन्यातील 40 हून अधिक सैनिक मारले गेले आहेत. बलूच आर्मीने अजूनही 180 प्रवाशांना बंदी बनवलेले आहे.

ऑडिओ संदेश

बलोच लिबरेशन आर्मीने एक ऑडिओ संदेश पाठवला आहे. पाकिस्तानी सैन्याचे आत्याचार आणि बलूचिस्तान प्रांताच्या संसाधनांचं शोषण होत असल्याने आम्हाला ही पावलं उचलावी लागली आहेत. दशकापासून पाकिस्तानी सैन्याकडून शोषण केलं जात आहे. त्यामुळे आम्ही जे युद्ध लढत आहोत, ती न्याय आणि अस्तित्वाची लढाई आहे. बलूचिस्तानातील माता आणि भगिनींसाठीची लढाई आहे. मातृभूमीसाठी आम्ही आमचे रक्त सांडवत आहोत, असं या ऑडिओ संदेशमध्ये म्हटलं आहे.

कशी झाली ट्रेन हायजॅक?

नेहमीप्रमाणे काल 11 मार्च रोजी जाफर एक्सप्रेस क्वेटाहून पेशावरला जात होती. बलोनच्या डोंगरातील एका टनेलमधून जात असताना बीएलएच्या अतिरेक्यांनी स्फोट घडवून आणले. 8 सशस्त्र अतिरेक्यांनी ट्रेनवर हल्ला चढवला. जाफर एक्सप्रेसच्या 9 डब्ब्यांमध्ये सुमारे 500 प्रवासी प्रवास करत होते. बोलान क्वेटा आणि सीबीच्या दरम्यान 100 किलोमीटरहून अधिक परिसर हा डोंगराळ भाग आहे. या दरम्यान 17 टनल आहेत. त्यातून रेल्वे ट्रॅक  गेले आहेत. दुर्गम भाग असल्याने या ठिकाणी ट्रेन अत्यंत धीम्या गतीने चालते. याच दरम्यान अतिरेक्यांनी पीरू कुनरी आणि गुदलारच्या डोंगराळ भागातील परिसरातील एका टनलमध्ये ही एक्सप्रेस हायजॅक केली. बलूचिस्तान लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

पाकिस्तानी सैन्याला इशारा

या अतिरेक्यांनी महिला आणि मुलांना सोडून दिल्याचा दावा केला आहे. पण पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी हा दावा खोडून काढला आहे. गृह राज्यमंत्री तलाल चौधरी यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बंदी असलेल्यांची सुटका सुरक्षा दलाने केली आहे, असं चौधरी म्हणाले. तर, ट्रेन पटरीवरून उतरवून तिला ताब्यात घेतल्याचं बीएलएने म्हटलं आहे. जर पाकिस्तानी सैन्याने एखादी मोहीम हाती घेतली तर ट्रेनमधील सर्व प्रवाशांचा खात्मा केला जाईल, असा इशारा या अतिरेक्यांनी दिला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.