Malegaon Temperature : मालेगावला पारा ३८. ४ अंशांवर
esakal March 13, 2025 12:45 AM

मालेगाव- शहर व परिसरात उन्हाचा तडाखा वाढला आहे. मंगळवारी (ता. ११) पारा ३८.४ अंशांवर पोहोचला आहे. तापमान वाढल्याने जनजीवनावर परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. रसवंतिगृहावरची गर्दी वाढू लागली आहे. शीतपेयांची दुकाने व कसमादेत उन्हाळ्यात लोकप्रिय असलेल्या टरबूज, खरबुजाच्या विक्रीत लक्षणीय वाढ होत आहे.

दरम्यान मार्च अखेर येथील पारा ४२ अंशापर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहराला जोडणाऱ्या सर्व मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी रसवंती, लिंबू शिखंजीची दुकाने थाटण्यात आली आहेत. या दुकानांवर आता गर्दी होत आहे. आइस्क्रीम, बर्फगोळे, कुल्फी आदींसह शीतपेयांच्या दुकानांवर गर्दी वाढू लागली आहे. मालेगावची ओळख असलेले मसाले ताक ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहे.

मालेगावला दरवर्षी तीन ते चार महिने कडक ऊन पडते. मार्चच्या पहिल्या दिवसापासून पारा ३५ अंश सेल्सअसपेक्षा अधिक आहे. दिवसागणिक तापमानात वाढ होत आहे. मंगळवारी पारा ३८.४ अंशावर गेल्याने दुपारी दळणवळणावर परिणाम झाला. उन्हाचे चटके बसत असल्याने अनेकांनी भर दुपारी बाहेर पडणे टाळले. शहर व परिसरात हंगामी व्यवसाय फुलले आहेत. वाढत्या तापमानामुळे या व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. रुमाल, टोपी, उपरणे विक्रीच्या हातगाड्या जागोजागी लावण्यात आल्या आहेत. चार दिवसापासून रसवंतीगृहांच्या घुंगरुंचा आवाज वाढला आहे. तालुक्यासह कसमादेत उन्हाळ्यात टरबूज, खरबूज ही फळे लोकप्रिय ठरतात.

उन्हाचे चटके वाढल्याने या दोन्ही फळांना मागणी वाढली आहे. या वर्षी चांगला भाव मिळत आहे. घाऊक बाजारात आठ ते दहा रुपयापर्यंत टरबुजाला भाव आहे. काही शेतकरी ट्रॅक्टर ट्रॉलीतून स्वत: टरबुजांची विक्री करीत आहेत. किरकोळ बाजारात टरबुजाचा भाव २० रुपये किलो आहे. शेतकरी २०, २५ व ३० रुपये नगाप्रमाणे टरबुजांची विक्री करीत आहेत. सध्या रमजान पर्व सुरु आहे. त्यामुळे येथे टरबुजांची मागणी वाढली असून शेतकऱ्यांसह किरकोळ व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.