कडूस, ता. १२ : खेड तालुका टपाल कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यात महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी टपाल खात्याच्या विविध योजनांच्या जनजागृतीसाठी महिला कर्मचाऱ्यांनी बाईक रॅली काढली.
खेड तालुका टपाल कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी राजगुरुनगर येथील मुख्य टपाल कार्यालयात सबपोस्टमास्तर कविता आढारी यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तुळशीच्या रोपांची लागवड करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर डोक्यावर फेटा बांधून महिलांनी राजगुरुनगर शहरातून बाईक रॅली काढली. यात महिलांनी पोस्टाच्या बचत आणि गुंतवणुकीच्या मासिक उत्पन्न योजना, सुकन्या समृद्धी योजना, नॅशनल सेव्हिंग्ज रिकरिंग डिपॉझिट अकाउंट, पीपीएफ, एनएससी, एफडी, आरडी, एमआयएस, केव्हीपी, एसएसवाय आदी लोकोपयोगी योजनांच्या माहितीचे पोस्टर हाती घेतले होते. यामध्ये कळंब पोस्टाच्या सबपोस्टमास्तर पूजा गायकवाड, धनश्री कोष्टी उपस्थित होत्या. हा आठवडा महिला आठवडा म्हणून साजरा करून जास्तीत जास्त महिलांना टपालाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा संकल्प महिलांनी केला असून आत्तापर्यंत या संकल्पांतर्गत ५५१ महिलांची विविध योजनांसाठी खाती उघडण्यात आली असल्याची माहिती आढारी यांनी दिली.