Shreeguru Paduka Darshan Utsav : भक्तांचा सेवेचा निर्धार, देणग्यांसाठी सरसावले हात
esakal March 13, 2025 07:45 AM

मुंबई - ‘सकाळ’च्या श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवाच्या निमित्ताने भगवंताच्या चरणी लीन होण्याचे भाग्य मिळाल्याचे समाधान प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर विलसत होते. भक्तिपूर्व वातावरणात श्रीगुरूंच्या चरणी मस्तक टेकवून दर्शन घेता आल्याने ते एका आध्यात्मिक अनुभूतीचा आनंद घेत होते.

एकाच वेळी २१ श्रीगुरूंचे दर्शन झाल्याने खऱ्या अर्थाने वारी पूर्ण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ‘सकाळ’च्या अशा सर्वच उपक्रमांत आम्हाला सेवा करण्याची संधी मिळावी, असे आर्जव महामुंबईतून आलेल्या अनेक भाविकांनी पादुका सोहळ्यानिमित्त केले. देणगी देण्यासाठीही अनेक भाविकांनी तयारी दर्शवली.

२१ श्रीगुरूंच्या पादुकांचा दर्शन उत्सव ८ आणि ९ मार्च रोजी वरळी ‘एनएससीआय’ डोममध्ये मोठ्या भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरण पार पडला. भक्ती-शक्ती व्यासपीठाद्वारे झालेल्या भक्तीच्या महाकुंभात पादुका दर्शनाने न्हाऊन निघालेल्या हजारो भक्तांनी सकाळ माध्यम समूहाचे हदयापासून आभार मानले.

२१ संत आणि श्री गुरूंच्या पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने दैवी पर्वणीची ‘याचि देही याचि डोळा’ अनुभूती मिळाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. ‘सकाळ’च्या वतीने होणाऱ्या प्रत्येक सामाजिक उपक्रमात विविध मार्गांनी सेवा करण्याची संधी मिळावी, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली.

असे कार्यक्रम होणार असतील तर आम्ही ‘सकाळ’सोबत स्वत:हून झोकून देऊन मदत करू, असा विश्वासही त्यांनी दिला. दोन दिवस झालेल्या उत्सवात अनेकांनी दानरूपी योगदान देण्याची तयारीही दाखवली. देणगी देण्यासाठी अनेक जण क्यूआर कोडची मागणी करत होते.

काही जणांनी तर अविरत सेवा देण्यासही आपण तयार असल्याची ग्वाही दिली. ज्येष्ठ नागरिकही त्यात आघाडीवर होते. गेल्या वर्षापासून ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव आयोजित केला जात आहे. त्यासाठी कोणाकडूनही कोणत्याही स्वरूपाची देणगी स्वीकारली जात नाही. उत्सवाचा सर्व खर्च ‘सकाळ’तर्फेच केला जातो.

भाविकांना अध्यात्माशी जोडण्याचे काम

मुंबईतील कार्यक्रमात २१ पादुकांच्या दर्शनामुळे आपली वारीची इच्छा पूर्ण झाल्याचा अभिप्राय ज्येष्ठ नागरिकांनी नोंदवला. आत्मिक समाधानाच्या शोधात प्रत्येक भाविक आपल्या कुटुंबासमवेत पादुका दर्शनासाठी आला होता. परत जाताना मात्र एक वेगळीच ऊर्जा, उत्साह आणि आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

सर्व भाविकांना अध्यात्माशी जोडण्याचे काम ‘सकाळ’च्या पादुका दर्शन उत्सवाने केले, अशी भावना सर्वच भक्तांनी उत्स्फूर्तपणे व्यक्त केली. अशा प्रकारच्या आध्यात्मिक सोहळ्यासाठी आम्ही आतापासूनच अधीर झालो आहोत, असे सांगत अनेकांनी ‘सकाळ’सोबत सेवारत राहण्याचा निर्धार केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.