‘एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळावा यासाठी लवकरात लवकर कृती आराखडा तयार करू,’ अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली.
भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांच्या प्रश्नांवर सरनाईक यांनी ही माहिती दिली. या चर्चेत सहभाग घेत दरेकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांना ठरलेल्या तारखेला पगार मिळावा यासाठी राज्य सरकार कृती आराखडा तयार करणार का, एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देणार का, असे प्रश्न केले. त्यावर मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका स्पष्ट केली.
अधिकाऱ्यांवर कारवाई
राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत अनियमितता करणाऱ्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी विनंती दरेकर यांनी सभागृहात प्रश्नोत्तराच्या चर्चेवेळी सरकारकडे केली. त्यांच्या या विनंतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महिन्यात चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे उत्तर दिले.
एसटी कर्मचाऱ्यांना लवकरच ‘पीएफ’
राज्य परिवहन मंडळातील कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) उपदान निधीचे दोन हजार २१४ कोटी ४७ लाख रुपये देणे बाकी आहे. परंतु कोणत्याही कर्मचाऱ्याचे नुकसान होऊ देणार नाही. त्यांच्या भविष्य निर्वाह निधी लवकरच देण्यात येईल, असे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेमध्ये दिले.
सदस्य डॉ. परिणय फुके यांनी याविषयी तारांकित प्रश्न मांडला होता. सरनाईक म्हणाले, ‘राज्य परिवहन मंडळाला प्रति माह ६४ कोटी रुपयांचा नुकसान होते. नागरिकांना दिलेल्या अनेक सवलतींमुळे एसटीचा तोटा वाढत आहे. मिळालेल्या उत्पन्नांतून कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जाते.
यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये राज्य परिवहन मंडळाला भरघोस आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी आणि उपदान निधी लवकरच खात्यावर जमा करू. राजकीय द्वेषातून एखाद्याला कारवाई करण्यासाठी विरोधक दबाव निर्माण करत आहे. परंतु कोणावर तरी कारवाई करणे उचित होणार नाही.’