Milk Rate Increase : महागाईचा चटका! दुधाच्या दरात होणार दोन रुपयांनी वाढ
esakal March 13, 2025 07:45 AM

कात्रज - महागाईचा चटका सर्वसामान्यांना सगळीकडे बसत असताना आता दुधाच्या दरातही २ रुपयांनी वाढ होणार आहे. बुधवार (ता. १२) रोजी दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कात्रज डेअरीमध्ये घेण्यात आली. त्यामध्ये हा निर्णय एकमताने घेण्यात आला. यावेळी विविध सहकारी व खाजगी संघांचे ४७ प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये पनीर भेसळ रोखण्यासाठी जनजागृती करण्याबाबत चर्चा झाली. शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान लवकरात लवकर देण्याबाबत शासनाकडे मागणी करण्याबाबत, एफडीए अन्न व औषध प्रशासन मंत्री/अधिकारी व दुग्धविकास मंत्री यांची भेट घेऊन भेसळखोरांवर कडक कारवाईची मागणी करण्याबाबतही चर्चा झाली.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के, मानद सचिव प्रकाश कुतवळ, संगमणेर दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, श्रीपाद चितळे व पुणे जिल्हा संघाचे अध्यक्ष स्वप्नील ढमढेरे उपस्थित होते.

प्रतिक्रिया

२ रुपयांप्रमाणे दरवाढीचा निर्णय एक मताने झाला आहे. सध्याच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय झाला आहे. वाढीव दर हे १५ मार्चपासून लागू करण्यात येणार आहेत.

- प्रकाश कुतवळ, मानद सचिव, दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघ

तक्ता

सध्याचे दर—-वाढीव दर

गाईचे दूध-५४ ते ५६ रुपये—५६ ते ५८ रुपये

म्हशीचे दूध—७० ते ७२ रुपये—-७२ ते ७४ रुपये

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.