Maharashtra Bhushan Award 2024 : महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी १७ नावांचे प्रस्ताव
esakal March 13, 2025 07:45 AM

महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ साठी राज्यातून सुमारे १७ प्रस्ताव आले आहेत. या शिफारस प्रस्तावातील सर्व मान्यवरांचे महाराष्ट्रासाठी अत्यंत मोलाचे योगदान आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत यासंबंधी कोणताही निर्णय न होता सर्व संबंधितांशी विचारविनिमय करून महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या नावाबद्दल लवकरच अंतिम निर्णय हा जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानभवन येथे ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’च्या निवड समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, पुरस्कार निवड समितीचे अशासकीय सदस्य डॉ. अनिल काकोडकर आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी सन्मान असून हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला देण्यात येतो.

‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ पुरस्कारासाठी सरकारला प्राप्त शिफारस प्रस्तावांपैकी एकाची निवड करणे अत्यंत कठीण काम आहे. पुरस्कार निवड समिती सदस्यांनी सुचविलेली नावे लक्षात घेऊन लवकरच हे पुरस्कार सर्व संबंधितांशी विचारविनिमय करून जाहीर करण्यात येतील. खारगे यांनी याबाबत सादरीकरण केले. महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीचे अशासकीय सदस्य यांनी पुरस्काराच्या निवडीबाबत मते मांडली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.