बलूचिस्तानात जाफर एक्सप्रेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याविरोधात पाकिस्तानी सैन्याकडून सुरु असलेलं ऑपरेशन पूर्ण झालं आहे. जवळपास 30 तास चाललेल्या या ऑपरेशनमध्ये बलोच लिबरेशन आर्मीच्या (BLA) सर्व 33 बंडखोरांना मारल्याचा दावा पाकिस्तानी सैन्याने केला आहे. . पाकिस्तान सैन्याचे प्रवक्ते लेफ्टनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी ऑपरेशनबद्दल माहिती देताना सांगितलं की, या कारवाईत फ्रंटियर कॉर्प्सचे (FC) चार सैनिक शहीद झाले. 21 प्रवाशांचा आधीच मृत्यू झाला होता. पण बलोच लिबरेशन आर्मीचा दावा यापेक्षा वेगळा आहे.
मंगळवारी बलोच बंडखोरांनी जाफर एक्सप्रेस हायजॅक करुन प्रवाशांना बंधक बनवलं होतं. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने या भागाला घेराव घालून ऑपरेशन सुरु केलं होतं. बोलानच्या डोंगराळ भागात हे ऑपरेशन चाललं. कारण ट्रेन तिथे थांबवण्यात आली होती. इथे बलोच बंडखोरांनी पाकिस्तानी सैन्यासमोर मोठं आव्हान उभ केलं होतं. पण पाकिस्तानी सैन्याने सर्व बंडखोरांना संपवल्याचा दावा केला आहे.
BLA बंडखोरांच आत्मसमर्पण का?
ऑपरेशन सुरु असताना बंडखोर स्वत:च्या बचावाचा प्रयत्न करत होते. पण सैन्याच्या घेराबंदीमुळे अखेर त्यांनी आत्मसमर्पण केलं. पाकिस्तानी सैन्याने सर्वच्या सर्व बंडखोरांना संपवल्याचा दावा केला आहे. या ऑपरेशनमध्ये कुठल्या निर्दोष माणसाचे प्राण गेले नाहीत, असा पाकिस्तानी सैन्य दलाचा दावा आहे. BLA च दीर्घकाळापासून बलूचिस्तानात पाकिस्तान सरकारविरोधात आंदोलन सुरु आहे. या संघटनेने यापूर्वी सुद्धा मोठे हल्ले केले आहेत. जाफर एक्सप्रेसवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने त्यांना उत्तर दिलं आहे.
स्फोट करण्याची संधी मिळाली नाही
सैन्याने हे ऑपरेशन अमलात आणताना सर्व बंधकांची सुरक्षित सुटका केली. दहशतवाद्यांनी बंधकांचे वेगवेगळे गट केले होते, त्यामुळे ऑपरेशन आव्हानात्मक बनलं होतं असं सुरक्षा सूत्रांनी सांगितलं. या कारवाई दरम्यान आत्मघातकी हल्लेखोरांना स्फोट करण्याची संधी मिळाली नाही. सुरक्षा दलाची तत्परता आणि रणनितीमुळे हे शक्य झाल्याचा पाकिस्तान सैन्याचा दावा आहे. सुरक्षा यंत्रणांनी हे ऑपरेशन दहशतवाद्यांविरोधात एक मोठ यश असल्याच म्हटलं आहे. या ऑपरेशनंतर सुरक्षा पथकांकडून या भागात सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं.
BLA चा दावा काय?
आमच्या ताब्यात अजूनही 150 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक बंधक म्हणून आहेत, असा दावा बलोच लिबरेशन आर्मीने केलाय. अजूनही अनेक नागरिक आणि सैनिक आमच्या ताब्यात आहेत असं BLA ने म्हटलय. आतापर्यंत 40 पाकिस्तानी नागरिक आणि 60 बंधकांचा मृत्यू झालाय असा BLA चा दावा आहे. पाकिस्तानी सैन्य आणि सरकारने या दाव्याची पुष्टी केलेली नाही. सर्व दहशतवाद्यांना संपवल्याचा पाकिस्तानी सैन्याचा दावा आहे. BLA च्या या स्टेटमेंटमुळे नेमकी परिस्थिती काय आहे? कोण खरं बोलतय? हे प्रश्न निर्माण झालेत.