नांदेड : लाडकी बहीण योजनेसाठी ३६ हजार कोटी रुपयांचा निधी आणि ओबीसी, एसईबीसी व ईडब्ल्यूएस विद्यार्थीनींना व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कात १०० टक्के सवलत देण्याच्या निर्णयाचा अर्थसंकल्पात समावेश करुन भाजप महायुती सरकारने आपला शब्द खरा केल्याचे भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी म्हटले आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पावर विधानसभेत झालेल्या चर्चेत त्या बोलत होत्या. विधानसभा निवडणुकीत दिलेली अनेक आश्वासने या अर्थसंकल्पात पूर्ण झाली व इतर आश्वासने पूर्ण करण्यासाठी ठोस पावले उचलल्याबद्दल राज्य सरकारची प्रशंसा करताना ''हम मन की बात करेंगे, एक नई शुरुआत करेंगे, सत्ता पाना लक्ष्य नही, हम तो दिलों पे राज करेंगे...'' हा शेर सांगताच अनेक सदस्यांनी बाके वाजवून त्यांना दाद दिली.
समृद्धी महामार्गाचा विस्तारित प्रकल्प असलेल्या जालना-नांदेड महामार्गाच्या कामाला अधिक वेग आणि अधिक निधी देण्यात यावा, तसेच शक्तिपीठ महामार्गासंदर्भात मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या सूचना ऐकून घ्यावी आणि योग्य मार्ग काढावा, अशी मागणी त्यांनी या चर्चेत केली.
नांदेड येथून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी थेट विमानसेवा सुरु करण्याची मागणीही त्यांनी मांडली.