Power Supply disrupted : गुजरातमध्ये बिघाड; महामुंबईत बत्ती गुल : तासभर वीजपुरवठा बंद; नागरिकांची गैरसोय
esakal March 13, 2025 01:45 PM

मुंबई : महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोव्याला वीजपुरवठा करणाऱ्या वेस्टर्न ग्रीडला गुजरातमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आज दुपारी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि पुण्याच्या काही भागांत सुमारे तासभर तीन हजार मेगावॉटचे भारनियमन करावे लागले. त्यामुळे वीज ग्राहकांची काहीशी गैरसोय झाली. दरम्यान, ग्रीड पूर्ववत झाल्याने वीजपुरवठा तासाभराने पूर्वपदावर आला.

देशाच्या कानाकोपऱ्यात तयार होणारी वीज सेंट्रल ग्रीडच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाते. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोव्यासाठी वेस्टर्न ग्रीड कार्यरत आहे. या ग्रीडला वीजपुरवठा करणाऱ्या गुजरातमधील वीज केंद्रात दुपारी २ वाजून ५५ मिनिटांनी बिघाड झाला. त्यातच विजेची मागणी जास्त आणि पुरवठा कमी, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

त्यामुळे संपूर्ण ग्रीड फेल होऊन वीजपुरवठा खंडित होण्याऐवजी महाराष्ट्र भार प्रेषण केंद्राने (एसएलडीसी) सर्व वीज वितरण कंपन्यांना काही भागांत भारनियमन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार महावितरणने ठाणे, नवी मुंबई आणि पुण्याच्या काही भागांत तीन हजार मेगावॉटचे भारनियमन केले. अदाणी इलेक्ट्रिसिटीने बोरीवली, मालाड, मिरा-भाईंदरमध्ये ८७ मेगावॉटचे भारनियमन केले. ग्रीडचा समतोल राखण्यासाठी टाटा पॉवरने अतिरिक्त ५५० मेगावॉट वीजनिर्मिती केल्याचा दावा केला.

एसएलडीसी’च्या निर्देशानुसार, महावितरणने ठाणे परिसरात घोडबंदर रोड, वागळे इस्टेटसह मुलुंड, नवी मुंबईत कोपरखैरणे, सानपाडा, नेरूळ, खारघरच्या काही भागांत सुमारे एक तास १४६ मेगावॉटचे भारनियमन केले. त्याचा सुमारे सव्वा लाख वीज ग्राहकांना फटका बसल्याची माहिती महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.