नाशिक : राज्यात गाजत असलेल्या मस्साजोग (जि. बीड) गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्त्येप्रकरणातील संशयित कृष्णा आंधळे शहरातील गंगापूर रोड परिसरात दिसल्याचा दावा काही नागरिकांनी केला.
शहर पोलिस ‘अलर्ट मोड’वर आले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि नागरिकांच्या चौकशीनंतर हा दावा फोल असल्याचे निष्पन्न झाले. सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणातील संशयित कृष्णा आंधळे हा गेल्या तीन महिन्यांपासून फरार आहे.
तो गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात प्रत्यक्ष बघितल्याचा दावा ॲड. गीतेश बनकर यांच्यासह काही नागरिकांनी केला. शहर गुन्हे शाखा युनिटसह गंगापूरचे गुन्हे शोध पथकाने गंगापूर रोड परिसरातील दत्त चौक गाठला.
दुचाकीवरून जाणारे दोघे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातील व्यक्ती कृष्णा आंधळे नसल्याचे निष्पन्न झाले.