बीडमध्ये ढाकणे पिता-पुत्राला अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याच्या अडचणी आणखी वाढत चालल्या आहेत. खोक्याला बुधवारी उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून अटक करण्यात आली. आज त्याला बीडमध्ये आणण्यात येणार आहे. त्यापूर्वीच त्याच्याविरोधात आणखी एक म्हणजे चौथा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभागाने वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश भोसले उर्फ खोक्यावर शिरूर पोलिस ठाण्यात एकूण चार गुन्हे दाखल झाले आहेत. आता नव्याने वनविभागाने वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोक्याला राहत असलेल्या जागेचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता खोक्याचे पाय आणखी खोलात अडकले आहेत.
सिंदखेड राजा येथील वाघ नाम व्यक्तीला क्रिकेटच्या बॅटने मारहाण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत खोक्याविरोधात पहिला गुन्हा नोंदवला. त्यानंतर वन्यजीवांना पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळीवरून ढाकणे पिता-पुत्राला मारहाण केली याप्रकरणी खोक्याविरोधात दुसरा गुन्हा दाखल झाला. तर ८ मार्च रोजी सतीश भोसलेच्या घरी वनविभाग आणि पोलिसांनी केलेल्या झाडाझडतीत गांजा सापडला, यावरून NDPS कायद्या अंतर्गत कलम ३० नुसार तिसरा गुन्हा दाखल झाला.
बुधवारी रात्री वनविभागाने वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत खोक्याविरोधात चौथा गुन्हा नोंदविला आहे. त्याबरोबरच खोक्या राहत असलेल्या जागेचा मालकी हक्क दावा दाखल करण्यासाठी त्याला ७ दिवसांची मुदत देण्यात आली. सात दिवसांत मालकी हक्क सिद्ध न झाल्यास वनविभाग पुढील कारवाई करून अतिक्रमण काढण्याची शक्यता आहे.