मॉरिशसमध्ये पुन्हा मोदी… मोदी… तिरंगा हातात घेऊन मोदींचं स्वागत, प्रचंड गर्दी उसळली
GH News March 13, 2025 04:12 PM

भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी रस्त्यावर नेहमीच गर्दी उसळते. पण मॉरिशसमध्ये जे दिसलं ते अनोखं होतं. मॉरिशसच्या गंगा तलावाकडे मोदी जेव्हा पोहोचले, तेव्हा त्यांची एक झलक पाहण्यासाठी अनेक किलोमीटरपर्यंत लोकांची रांग लागली होती. कुणाच्या हातात मॉरिशसचा झेंडा होता, तर कुणाच्या हातात तिरंगा होता. तर काहींनी पुष्पगुच्छ आणले होते. प्रत्येकजण मोदी मोदी करत होता. प्रत्येकाला मोदींना पाहण्याची आणि त्यांच्या हातात घेण्याची एकच ओढ लागली होती. भारताबाहेरचं हे चित्र अत्यंत अनोखं आणि विलोभनीय असंच होतं.

मॉरिशसच नाही तर संपूर्ण जगात मोदींची मोठी फॅन फॉलोइंग आहे. पीएम मोदी जिथेही जातात तिथे त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळते. जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यात मोदी गेले तरी त्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी होते. जगातील शेवटच्या कोपऱ्यात राहणारे भारतीय सुद्धा मोदींना पाहण्यासाठी उत्सुक असतात. मॉरिशसमध्येही असंच घडलं. रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे होते. मोदींना पाहत होते. त्यांच्या येण्याची वाट पाहत होते.

मोदींचा सन्मान

मोदी दोन दिवसांच्या मॉरीशस दौऱ्यावर गेले होते. मॉरिशसच्या 57व्या राष्ट्रीय दिवस समारंभात ते मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. पीएम मोदींना मॉरीशसचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन (जीसीएसके) ने सन्मानित करण्यात आलं. मॉरिशसचे राष्ट्रपती धर्मवीर गोखूल यांनी मोदींना सन्मानित केलं.

मोदी काय म्हणाले?

मॉरिशसमध्ये पहिल्यांदाच एखाद्या भारतीय राजकारण्याचा एवढा मोठा सन्मान करण्यात आला आहे. पीएम मोदी यांनी हा पुरस्कार भारताच्या 1.4 अब्ज नागरिकांना आणि मॉरिशसमध्ये राहणाऱ्या 1.3 मिलियन भारतीयांना समर्पित केला आहे. यावेळी त्यांनी मॉरिशसमधील भारतीय समुदायाशी संवाद साधला. मी जेव्हा कधी मॉरिशसला येतो तेव्हा मी आपल्याच लोकांच्यामध्ये आलोय असं वाटतं, असं मोदी म्हणाले.

हे एक कुटुंब आहे

मॉरिशसमधला सर्वात मोठा सन्मान मिळाल्याबद्दलही मोदींनी प्रतिक्रिया दिली. ही केवळ माझ्या सन्मानाची गोष्ट नाहीये. हा भारत आणि मॉरिशस दरम्यानच्या ऐतिहासिक संबंधांचा सन्मान आहे. मॉरीशस हा एक मिनी इंडियासारखा आहे. मॉरिशस केवळ एक सहकारी देश नाही, तर तो आमच्यासाठी कुटुंबासारखा आहे. मॉरिशस भारताच्या सागर व्हिजनच्या केंद्रस्थानी आहे. जेव्हा मॉरिशस समृद्ध होतो, तेव्हा सर्वात आधी भारतात जल्लोष होतो, असं मोदी म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.