चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर बीसीसीआय आता लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआय येत्या काही दिवसांमध्ये वार्षिक कराराची घोषणा करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या वार्षिक करारात अनेक उलटेफर पाहायला मिळू शकतात. काही खेळाडूंनी क्रिकेटला अलविदा केला आहे, तर काहींनी एका फॉर्मेटमधून निवृ्त्ती घेतली आहे. त्यामुळे या वार्षिक करारात मोठे बदल पाहायला मिळणार असल्याचं नक्की आहे. तसेच काही खेळाडू असेही आहेत जे करारबद्ध असूनही खेळत नाहीत. त्यामुळे बीसीसीआय त्यांच्या जागी नव्या खेळाडूंना संधी देऊ शकते.
बीसीसीआय खेळाडूंना एकूण 4 श्रेणीमध्ये विभागते. बीसीसीआयकडून वार्षिक करारासाठी खेळाडूंना ए प्लस, ए, बी आणि सी अशाप्रकारे विभागलं जातं. कसोटी, वनडे आणि टी 20i अशा तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळणाऱ्यांना ए ग्रेडमध्ये ठेवलं जातं. बीसीसीआयकडून गेल्या वार्षिक करारात एकूण 4 खेळाडूंचा ए ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे या दोघांना ए प्लस कॅटेगरी मिळणार नाही, हे निश्चित आहे. त्यामुळे विराट आणि रोहितला 2 कोटींचं नुकसान सहन करावं लागणार आहे. बीसीसीआय ए प्लस कॅटेगरीतील खेळाडूंना वार्षिक 7 कोटी रुपये देते. तसेच ए ग्रेड खेळाडूंना 5, बी श्रेणीतील खेळाडूंना 3 तर सी श्रेणीतील खेळाडूंना 1 कोटी रुपेय दिले जातात.
रोहित, विराट, जडेजाव्यतिरिक्त मोहम्मद सिराजला यालाही फटका बसू शकतो. सिराज सध्या ए श्रेणीत आहे. मात्र त्याला बीसीसीआय बी श्रेणीत टाकू शकते. त्यामुळे सिराजला 2 कोटींचा आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो.
दरम्यान बीसीसीआय काही खेळाडूंचा या वार्षिक करारात समावेश करु शकते. यामध्ये श्रेयस अय्यर, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा या तिघांची नावं आघाडीवर आहेत. श्रेयसला गेल्या वर्षी शिस्तभंग केल्याने वार्षिक करारातून वगळण्यात आलं होतं. त्यामुळे आता या तिघांना बीसीसीआय कोणत्या श्रेणीनुसार वार्षिक करारात स्थान देणार? याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.