मालेगाव- राज्य सरकारतर्फे स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यासंदर्भात हलचाली सुरु आहेत. महावितरणला खासगीकरणाकडे ढकलण्याचा डाव सरकारचा आहे. महावितरणतर्फे नवीन वीजमीटर जोडणी व खराब झालेल्या वीज मिटरांना स्मार्ट प्रीपेड मीटर बसविले जात आहे. या संदर्भात मालेगाव वीज ग्राहक बचाव समितीतर्फे मालेगाव तालुक्यातील वीस ग्रामपंचायतींना भेट देऊन ग्रामपंचायतींनी स्मार्ट मीटरच्या विरोधात ठराव दिला आहे.
शासनातर्फे ग्राहकांना नवीन वीज मीटर बनवितांना स्मार्ट मीटर बसविले जात आहे. कालांतराने या मीटरलाच कंपनीतर्फे प्रीपेड मीटर करण्यात येईल. या मीटरचे दिवसा वेगळे व रात्री वेगळे दर असणार आहेत. तसेच यासाठी मालेगाव वीज ग्राहक बचाव समितीतर्फे यापूर्वी आंदोलन व पत्रकार परिषद झाली. समितीतर्फे तालुक्यातील १२५ गावात नागरीकांना व ग्रामपंचायतींना भेटी देऊन स्मार्ट मीटर संदर्भात ठराव पारीत केला जाणार आहे.
तत्कालीन उर्जामंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उर्जामंत्री असतांना स्मार्ट मीटर जनतेवर लादणार नाही असे सांगितले असतांना देखील सत्तेवर आल्यानंतर जनतेची दिशाभूल केली जात आहे. यात शेतकरी व सर्वसामान्य नागरीकांचा रोष निर्माण होत आहे. समितीतर्फे अशोक सावंत, दिनेश ठाकरे, शरद शेवाळे, जितेंद्र देसले, सागर पाटील, पुरुषोत्तम जगताप, शुभम खैरनार आदींनी वीस गावांमध्ये भेटी देऊन जनजागृती केली आहे.
...या गावांचा विरोध
समितीने आतापर्यंत २० ते २५ गावांना भेटी दिल्या आहेत. यात २० ग्रामपंचायतींनी स्मार्ट मीटरच्य विरोधात ठराव दिला आहे.समितीतर्फे येथील शेंदुर्णी, गिगाव, दहिवाळ, हिसवाळ, रोझे, पाडळदे, शेरुळ, साजवहाळ, नाळे, येसगाव खुर्द, येसगाव बुद्रुक, मथुरपाडे, भुईगव्हाण, विराणे, खायदे, मळगाव, उंबरदे यासह अनेक गावांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. आगामी काळात मोठे जनआंदोलन छेडले जाणार आहे. तसेच यापैकी शंभर गावांमध्ये होळीनंतर समितीतर्फे दौरे करुन भेटी दिल्या जाणार आहेत. २८ फेब्रुवारीला नाशिक येथे स्मार्ट मीटर संदर्भात हरकती घेण्यात आल्या. यात नाशिक येथील उद्योजक व नागरीकांनी यास विरोध केला आहे.
तालुक्यात सुमारे ५५ स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. नागरीकांना या संदर्भात कुठलीही कल्पना दिली जात नाही. तसेच नादुरुस्त मीटर काढून स्मार्ट मीटर बसविण्याचे शासनाचे धोरण आहे. महावितरण कंपनीला खासगीकरण करुन अदानी यांच्याकडे सोपविण्यासाठी सरकारचा डाव आहे.
- दिनेश ठाकरे, मालेगाव वीज ग्राहक बचाव समिती सदस्य