Chandrabhaga River : तीस कोटींच्या यंत्रणेनंतरही चंद्रभागेतील पाणी अस्वच्छच: बसविला फ्लोटींग बोटी, आरोग्याचा प्रश्न 'जैसे थे'
esakal March 13, 2025 05:45 PM

पंढरपूर : चंद्रभागा नदीचे पाणी दूषित झाले आहे. हे पाणी शुद्ध आणि स्वच्छ करण्यासाठी परदेशी तंत्रज्ञानाचा आधार घेऊन सेबर टेक्नॉलॉजीच्या आधारे प्रथमच फ्लोटिंग बोटी बसविण्यात आल्या आहेत. जवळपास ३० कोटी रुपये खर्चून बसविलेल्या या यंत्रणा कुचकामी ठरल्याचे समोर येत आहे.

चंद्रभागेतील पाणी शुद्ध व स्वच्छ राहावे, यासाठी प्रायोगिक तत्त्वावर पाणी शुद्ध करणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे. ही यंत्रणा दोन-तीन महिन्यांपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र या यंत्रणेचा पाणी शुद्धीकरणासाठी फारसा उपयोग झाल्याचे दिसून आले नाही. परदेशी तंत्रज्ञानाचा आधार घेऊन तयार करण्यात आलेल्या सेबर टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे.

प्रथमच फ्लोटिंग बोटी बसविण्यात आल्या आहेत. याद्वारे सध्या पाणी स्वच्छ व शुद्ध करण्याची प्रक्रिया केली जाते. मात्र, या कालावधीमध्ये किती पाणी स्वच्छ व शुद्ध केले, त्यातून किती कचरा एकत्र करण्यात आला, याची माहिती मात्र अद्याप समजली नाही. त्यामुळे पाणी शुद्ध करण्याची यंत्रणा कुचकामी ठरल्याची चर्चा भाविकांमध्ये आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये सेबर टेक्नॉलॉजी कार्यान्वित करून देखील चंद्रभागेची दुरवस्था जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहे. चंद्रभागा स्वच्छ व शुद्धीकरणासाठी राज्य सरकारने कायमस्वरूपी यंत्रणा उभी करावी, अशी मागणी वारकरी भाविकांमधून केली जात आहे.

चंद्रभागा नदीतील पाणी स्वच्छ व शुद्धीकरणासाठी बसवण्यात आलेली यंत्रणा कूचकामी ठरली आहे. या यंत्रणेचा पाणी शुद्धीकरणासाठी फारसा उपयोग होताना दिसत नाही. गेल्या दोन महिन्यांपासून यंत्रणा सुरू असतानाही नदीपात्रामध्ये कीडे, अळ्या आढळून आल्या आहेत. यामुळे भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा.

- गणेश अंकुशराव, सामाजिक कार्यकर्ते, पंढरपूर

काय आहे सेबर टेक्नॉलॉजी

देशात पहिल्यांदात वापरण्यात येणारी ही सेबर टेक्नॉलॉजी पाण्यातील बॅक्टेरिया नष्ट करून पुन्हा पाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे पाणी शुद्ध होते.

नदीत सध्या कीडे अन् शेवाळ

चंद्रभागेच्या पाण्यामध्ये शेवाळासह फाटलेले कपडे, प्लास्टिक असा मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. शिवाय किडे आणि आळ्या झाल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.