रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने आयसीसी स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. टी20 वर्ल्डकपनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धाही जिंकली आहे. असं असताना रोहित शर्मा आता पुढच्या तयारीला लागला आहे. अभिषेक नायरसह फिटनेसवर काम करत आहे. त्यामुळे रोहित शर्मा पुढच्या मालिकेत खेळणार की नाही? याबाबत कधी निर्णय घेतला जाईल अशा चर्चा रंगली आहे. असं असताना मिडिया रिपोर्टनुसार, भारत इंग्लंड कसोटी मालिकेत रोहित शर्मा खेळणार की नाही याचा फैसला आयपीएलनंतर घेतला जाणार आहे. आयपीएलमध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून मैदानात उतरणार आहे. यावेळी त्याचं फिटनेस पाहून इंग्लंड दौऱ्याबाबत विचार केला जाणार आहे. रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शेवटचा कसोटी सामना खेळला नव्हता. तेव्हा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवली होती.
क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, रोहित शर्मा 2027 वनडे वर्ल्डकपच्या तयारीसाठी सहाय्यक कोच अभिषेक नायरसोबत फिटनेस, फलंदाजी आणि पुढच्या कामगिरीवर काम करत आहे. रोहित शर्मा वनडे वर्ल्डकप स्पर्धेत 40 वर्षांचा होईल. त्यामुळे या स्पर्धेसाठी रोहित शर्माने फिट अँड फाईन राहण्याची तयारी आतापासूनच केली आहे. दुसरीकडे, रोहित शर्माने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतरच त्याने वनडे वर्ल्डकप 2027 वर लक्ष केंद्रीत केल्याचं सांगितलं. एकदा हाती आलेली संधी गमावल्यानंतर रोहित शर्मा पुन्हा एकदा वनडे वर्ल्डकप स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने चांगली कामगिरी केली आहे. राहुल द्रविडनंतर प्रशिक्षक गौतम गंभीरसोबतही त्याचे सूर जुळून आले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी फेरीत आणि उपांत्य फेरीत रोहित शर्माची कामगिरी हवी तशी झाली नाही. पण अंतिम फेरीत जबरदस्त खेळी करत मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला. आता रोहित शर्मा 2027 पर्यंत दोन वर्षांच्या कालावधीत फिटनेस आणि फॉर्म कायम ठेवतो हे पाहणं महत्त्वाचं आहे.