बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. उद्या म्हणजेच १४ मार्च रोजी आमिर खानचा ६० वा वाढदिवस आहे. त्याने फॅन्स आणि पॅपराझी यांच्यासह आज वाढदिवसाच्या एक दिवसी आधी बर्थडे सेलिब्रेट केला. या सेलिब्रेशनदरम्यान आमिरने त्याच्या नव्या गर्लफ्रेंडबद्दल माध्यमांना माहिती दिली.
२००२ मध्ये आमिर खान आणि रिना दत्ता यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर २००५ मध्ये आमिरने किरण रावशी लग्न केले. २०२१ मध्ये त्यांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या घटस्फोटानंतर आमिर पुन्हा एकदा प्रेमात पडला असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. या चर्चांवर आमिरने शिक्कामोर्तब केले आणि नव्या गर्लफ्रेंडबद्दल सर्वांना सांगितले. आमिरच्या गर्लफ्रेंडचे नाव गौरी आहे.
टाइम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, माध्यमांसोबत आमिर खानने त्याच्या नव्या रिलेशनशिपची कबुली दिली. बर्थडे पार्टीमध्ये त्याने गौरीला माध्यमांसमोर आणले. त्यांच्याशी भेट करवून दिली. दरम्यान आमिरने गौरीचे फोटो किंवा व्हिडीओ घेऊ नये अशी विनंती केली. विनंतीला मान देत माध्यमांनीही गौरीचे फोटो काढणे टाळले.
आमिर खानच्या कुटुंबीयांना गौरी भेटली आहे. ती बेंगळुरूमध्ये राहते. ती सेलिब्रिटी नसल्याचे आमिरने सांगितले आहे. गौरीचा सहा वर्षाचा मुलगा असल्याची माहिती देखील समोर आली आहे. वाढदिवसाच्या आधी आमिरने दिलेल्या या सप्राईजची सर्वत्र चर्चा होत आहे. त्याच्या गर्लफ्रेंडचा फोटो कधी प्रसिद्ध होईल असे चाहत्यांना झाले आहे.