लाहोर : बलुचिस्तानसह देशभरात जनतेच्या विश्वासावर आधारित सरकार स्थापन होईपर्यंत स्थिरता अशक्य आहे, असे तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले.
‘एक्स’वरील ट्विट करताना ते म्हणाले, ‘‘लष्करी कारवाया कधीही समस्यांवर उपाय नसतात. शांतता आणि स्थिरतेसाठी वाटाघाटी आणि प्रयत्नांद्वारे मोठी युद्धे देखील सोडवली जातात. बलुचिस्तान आणि खैबर-पख्तुनख्वा प्रांतातील परिस्थितीबद्दल चिंता वाटते.
बलुचिस्तानमध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी क्वेटाहून पेशावरला ४४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ट्रेनचे अपहरण केले. बुधवारी लष्कराने घटनास्थळी सर्व ३३ दहशतवाद्यांना ठार मारले. तत्पूर्वी दहशतवाद्यांनी २१ प्रवासी आणि चार निमलष्करी सैनिकांची हत्या केली. अफगाणिस्तानशी असलेली आपली सीमा विस्तृत आहे आणि त्यांच्याशी असलेले प्रश्न चर्चेद्वारे सोडवले पाहिजेत. शेजारील देशांसोबतचे आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्र आणि सार्वभौम असल्याशिवाय देशात शांतता प्रस्थापित होणे अशक्य राहील.’’
पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफचे संस्थापक असलेले ७२ वर्षीय इम्रान खान पुढे म्हणाले की, देशात पुन्हा एकदा दहशतवादाने मूळ धरले आहे. आमच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात पाकिस्तानने दहशतवादाला आळा घातला होता. जागतिक दहशतवाद निर्देशांकात पाकिस्तानचे रँकिंग चार स्थानांनी सुधारले होते. मात्र राजवट बदलल्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा जागतिक दहशतवाद निर्देशांकात दुसऱ्या क्रमांकावर आले आहे, असे ते म्हणाले.
रावळपिंडीतील अडियाला तुरुंग प्रशासन कायद्याच्या पलीकडे जाऊन काम करत आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही दोन आठवड्यांपासून आपल्याला मुलांशी बोलण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. चार महिन्यांत फक्त चार वेळा त्यांच्याशी बोलण्याची परवानगी मिळाली. माझी पुस्तकेही दिली जात नाहीत. हे सर्व मूलभूत मानवी हक्कांचे उल्लंघन आहे, अशी तक्रारही त्यांनी केली.