Fussclass Dabhade : 'फसक्लास दाभाडे' चित्रपटाने OTTवर घातला धुमाकूळ, थिएटरमध्येही पूर्ण केलं अर्धशतक
Saam TV March 14, 2025 05:45 PM

'फसक्लास दाभाडे' (Fussclass Dabhade) या चित्रपटाने थिएटरमध्ये कमाल कमाई केली. त्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर आला आणि हेमंत ढोमेच्या 'फसक्लास दाभाडे' चित्रपटाने धुमाकूळ घातला. या चित्रपटाला खूप प्रेम मिळाले आहे. चित्रपट महाराष्ट्रातच नाही तर सातासमुद्रापारही प्रेक्षकांचे प्रेम मिळवण्यात यशस्वी झाला. युएई - जीसीसी प्रदेश, युके येथे या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला.

(OTT) रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात संपूर्ण भारतात बघितल्या जाणाऱ्या पहिल्या तीन चित्रपटांमध्ये 'दाभाडे' जाऊन पोहोचला. ओटीटीवर हा चित्रपट उत्तमरित्या चालत असतानाही अनेक प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहण्याला पसंती दर्शवली आणि आता हा चित्रपट सिनेमागृहात यशस्वी अर्धशतक साजरे करत आहे.

कलाकार मंडळी

खट्याळ भावंडांची स्टोरी असणाऱ्या या चित्रपटात तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत. यामध्ये क्षिती जोग, चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. टी-सीरीज, कलर येल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी निर्मित 'फसक्लास दाभाडे'चे भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते आहेत. कुटुंबातील नातेसंबंध, सामाजिक संदर्भ, मजेशीर संवाद आणि प्रसंग या सगळ्यामुळे 'फसक्लास दाभाडे' हा एक परिपूर्ण कौटुंबिक चित्रपट ठरला आहे.

'फसक्लास दाभाडे' चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) म्हणाला की, "खूप आनंद वाटतोय की आपल्या मातीतला 'फसक्लास दाभाडे' चित्रपटगृहात सलग पन्नास दिवस पूर्ण करतोय आणि ओटीटी वर देखील अव्वल ठरतोय. मुळात ही कथा तुमच्या आमच्या घरातली असल्याने ती प्रेक्षकांना विशेष भावतेय. प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत आणि त्यामुळेच असेच नवनवीन विषय प्रेक्षकांपुढे आणण्याची उर्जा देखील मिळते. झिम्मा, झिम्मा २ नंतर फसक्लास दाभाडे देखील चित्रपटगृहात ५० दिवस पूर्ण करतोय. आजवर मराठी प्रेक्षकांनी आम्हाला जे प्रेम दिलं त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे."

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.