आयपीएल 2025 स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेला आठ दिवसांचा अवधी शिल्लक असताना दिल्ली कॅपिटल्सने कर्णधार जाहीर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा पेच कायम होता. केएल राहुलने नकार दिल्यानंतर कर्णधारपदाची धुरा फाफ डुप्लेसिस की अक्षर पटेलच्या खांद्यावर पडणार याची चर्चा होती. पण अखेर कर्णधारपदाची धुरा अष्टपैलू अक्षर पटेलच्या खांद्यावर पडली आहे. अक्षर पटेल सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. टीम इंडियातही तो चोख कामगिरी बजावत आहे. त्याच्या या खेळीसाठीच फ्रेंचायझीने त्याच्या खांद्यावर जबाबदारी टाकली आहे. दिल्ली कॅपिटल्स अद्याप एकदाही जेतेपद मिळवलेलं नाही. त्यामुळे अक्षर पटेलच्या नेतृत्वात जेतेपदाचं स्वप्न पूर्ण होईल का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. या आयपीएल स्पर्धेत पाच संघ नवीन कर्णधारांसह खेळत आहेत. तर 9 भारतीय कर्णधार आहेत, तर एकच विदेशी कर्णधार असणार आहे.
आयपीएल 2025 स्पर्धेसाठी लखनौ सुपरजायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी नवीन कर्णधारांची नियुक्ती केली आहे. दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे, तर ऋषभ पंतने लखनौ सुपरजायंट्सचे नेतृत्व स्वीकारले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यावेळी रजत पाटीदारवर विश्वास व्यक्त केला आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यर पंजाब किंग्जचे नेतृत्व करेल, तर अजिंक्य रहाणे कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करेल.उर्वरित पाच संघांनी गेल्या वेळी संघाचे नेतृत्व करणाऱ्या कर्णधारावर विश्वास टाकला आहे.
चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करेल, तर मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पंड्या करेल. शुभमन गिल गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून कायम राहील, तर संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचा कर्णधार म्हणून आणि पॅट कमिन्स सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार म्हणून कायम राहतील. सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली आहे. या पर्वात संघाचे नेतृत्व करणारा पॅट कमिन्स हा एकमेव विदेशी कर्णधार आहे. पण पॅट कमिन्स सध्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे तो खेळला नाही तर दुसऱ्या खेळाडूचा विचार केला जाईल.